भारताच्या नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याने ऑलिम्पिक रेकॉर्डही मोडला.
पण या सर्वांमध्ये, नीरज चोप्रा याच्या आईचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले आहे. यासाठी पाकिस्तानमध्ये नीरजच्या आईचे खूप कौतुक होत आहे.
वास्तविक, नीरजच्या आईने पाकिस्तानच्या अर्शदला आपला मुलगा म्हणून संबोधून संपूर्ण भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांची मने जिंकली आहेत. या प्रतिक्रियेवर पाकिस्तानी चाहते नीरजची आई सरोज देवी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
एका पाकिस्तानी चाहत्याने तर म्हटले आहे की, जर एखाधी आईने संपूर्ण जगाचे नेतृत्व केले तर जगात द्वेष राहणारच नाही.
एकीकडे नीरज चोप्राच्या आईने अर्शदला आपला मुलगा म्हटले, तर दुसरीकडे अर्शद नदीमच्या आईनेही नीरजला आपला मुलगा म्हणून संबोधून दोन्ही देशांतील लोकांची मने जिंकली. अशा विचारांसाठी नीरज चोप्राच्या आईला सुवर्णपदक द्यायला हवे, असेही एका चाहत्याने म्हटले आहे.
नीरज चोप्राची आई म्हणाली - आम्हाला वाईट वाटत नाही. हे रौप्यपदकदेखील सुवर्णासारखे आहे. तोही (अर्शद) आमचाच मुलगा आहे, तो खूप मेहनत करतो. खेळाडूच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात, पण रौप्यपदकाने आम्ही खूप आनंदी आहोत.
अर्शदची आई म्हणाली- नीरजही माझ्या मुलासारखा आहे, तो नदीमचा मित्रही आहे. विजय आणि पराभव हा खेळाडूच्या जीवनाचा एक भाग असतो आणि तो पदकं जिंकत राहावा यासाठी मी त्याच्यासाठी प्रार्थना करते.
भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांचा पहिला राऊंड फाउल गेला. पण एकीकडे नीरज चोप्राने दुसऱ्या थ्रोमध्ये ८९.४५ मीटर अंतर कापले, तर अर्शदने ९२.९७ मीटर अंतर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम केला. आपल्या शेवटच्या थ्रोमध्येही अर्शदने ९१ मीटर अंतरावर भाला फेकून सर्वांना चकित केले. दुसरीकडे, नीरज चोप्राचे एकूण ५ प्रयत्न फाऊल झाले, त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.