Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये लक्ष्य सेनने सुवर्णपदक जिंकले आहे. लक्ष्यने बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या आंग जे योंगचा ((Tze Yong)) १९-२१, २१-९, २१-१६ असा पराभव केला. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे २० वे सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर आज भारताने बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे.
या स्पर्धेत लक्ष्यची कामगिरी अभूतपूर्व ठरली आहे. त्याने या स्पर्धेतील आठ इव्हेंटमध्ये एकूण १८ सामने खेळले आहेत. यातील त्याने १६ जिंकले सामने आहेत. अंतिम फेरीत त्याने मलेशियन खेळाडूला हरवून श्रीकांतच्या पराभवाचा बदलाही घेतला आहे.
यानंतर पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत २० सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्यपदक जमा झाले आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील लक्ष्य सेनचे एकेरीतील हे पहिलेच पदक आहे. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेला शटलर लक्ष्य सेनने राष्ट्रकुलमध्ये हे दुसरे पदक जिंकले आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत त्याने यावेळी रौप्यपदक पटकावले आहे. आता या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने सुवर्ण जिंकून इतिहास रचला आहे.