Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या पदरात निराशा पडली. लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसनकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. व्हिक्टरने ५४ मिनिटांत २०-२२, १४-२१ असा विजय मिळवला. लक्ष्यने दमदार सुरुवात केली. पण सध्याच्या ऑलिंपिक चॅम्पियनवर मात करता आली नाही. मात्र, पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लक्ष्य सेनकडून कांस्य पदकाची आशा केली जाते. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तो कांस्य पदकासाठी लढणार आहे. लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनचा पराभव केला. ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरी खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे.
लक्ष्यने पहिल्या गेममध्ये एकेकाळी १८-१३ अशी आघाडी घेतली. मात्र, अनुभवी व्हिक्टरने पिछाडीवर पडूनही लय मिळवली. त्यानंतर ३० वर्षीय खेळाडूने नऊ गुण मिळवले. तर, लक्ष्यला केवळ दोन गुण मिळवता आले. लक्ष्यने दुसऱ्या गेमची सुरुवातही चांगली केली. त्याने ७-० अशी आघाडी घेतली. पण व्हिक्टरने पुनरागमन केले. लक्ष्यकडे त्याच्या दमदार फटकेबाजीला उत्तर नव्हते. व्हिक्टरने ८-७ अशी माफक आघाडी घेतली आणि लगेचच १७-१३ अशी आघाडी घेतली. लक्ष्यने खूप प्रयत्न केले. पण त्याला १४ पेक्षा जास्त गुण जोडता आले नाहीत. लक्ष्यचा व्हिक्टरविरुद्ध नऊ सामन्यांतील हा आठवा पराभव आहे. लक्ष्यने २०२२ मध्ये जर्मन ओपनमध्ये व्हिक्टरला एकदाच पराभूत केले होते.
सोमवारी कांस्य पदकाच्या लढतीत लक्ष्यचा सामना मलेशियाच्या ली झियाशी होणार आहे. झियाला उपांत्य फेरीत थायलंडच्या आठव्या मानांकित कुनलावुत विटिडसरनकडून १४- २१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्य आता झियाला पराभूत करून ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू बनण्याचे लक्ष्य असेल. तर, अंतिम सामना व्हिक्टर आणि विटिडसरन यांच्यात होणार आहे.
व्हिक्टरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. २०१७ आणि २०२२ मध्ये तो वर्ल्ड चॅम्पियन होता. त्याच्या नावावर २०१६ मधील थॉमस चषक विजयाचा समावेश आहे. याशिवाय त्याने अनेक बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर आणि सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले आहे. इतकेच नाही तर डिसेंबर २०२१ ते जून २०२४ या काळात तो जगातील नंबर वन खेळाडूही होता.