मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kuldeep Yadav: मिस्ट्री बॉल! बाबर आझमप्रमाणं मार्करमदेखील फसला, कुलदीपच्या ‘या’ चेंडूला उत्तर नाही

Kuldeep Yadav: मिस्ट्री बॉल! बाबर आझमप्रमाणं मार्करमदेखील फसला, कुलदीपच्या ‘या’ चेंडूला उत्तर नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 08:29 PM IST

IND vs SA 1st ODI - Kuldeep Yadav: आफ्रिकन फलंदाज एडन मार्करमला बाद करण्यासाठी कुलदीप यादवने शानदार चेंडू टाकला. असाच चेंडू कुलदीपने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमला टाकला होता. त्या आठवणींना आज उजाळा मिळाला.

Kuldeep Yadav mystery ball
Kuldeep Yadav mystery ball

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ४० षटकांत ४ बाद २४९ धावा केल्या आहेत. पावसामुळे सामना ४० षटकांचा खेळवण्यात येत आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजीस आलेल्या आफ्रिकन संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि यानेमन मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर कर्णधार टेम्बा बवूमा आणि एडन मार्करम स्वस्तात बाद झाले. बवुमाला शार्दुल ठाकूरने ८ धावांवर क्लीन बोल्ड केले. तर मार्करमला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या जाळ्यात अडकवले. मार्करम शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.

कुलदीपचा मिस्ट्री बॉल

कुलदीप यादवने मार्करमला जादूई चेंडू टाकला. या चेंडूवर मार्करम क्लीन बोल्ड झाला. असाच चेंडू कुलदीपने २०१९ च्या विश्वचषकात पाकिस्तानच्या बाबर आझमला टाकला होता. बाबर देखील क्लीन बोल्ड झाला होता.

कुलदीपने त्याच्या षटकातील पहिले ४ चेंडू अप्रतिम टाकले. या सर्व चेंडूंचा सामना करताना मार्करम अडचणीत दिसला. शेवटी पाचव्या चेंडूवर डिफेन्स करण्याच्या नादात मार्करम चेंडूची लाईन चुकला आणि क्लीन बोल्ड झाला. डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मार्करमच्या बॅट आणि पॅडमध्ये थोडेसे अंतर निर्माण झाले होते. त्याच अंतरातून कुलदीपचा चेंडू आत घुसला आणि ऑफस्टम्पवर आदळला.

 

ऋतुराज गायकवाड आणि रवी विश्नोई यांचा डेब्यू

तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवनने गुरुवारी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सामना पावसामुळे ४०-४० षटकांचा करण्यात आला आहे. पहिला आणि तिसरा पॉवरप्ले ८ षटकांचा तर दुसरा पॉवरप्ले २४ षटकांचा असेल. शिखर धवनने आज ऋतुराज गायकवाड आणि रवी विश्नोई यांना पदार्पणाची संधी दिली आहे. दोघांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे आहे.

WhatsApp channel