FIDE Women World Rapid Championship : काही दिवसांपूर्वीच डी गुकेश याने बुद्धिबळाच्या जगात आपले वर्चस्व सिद्ध करून जगभरात भारताचा झेंडा फडकवला होता. आता भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनेदेखील बुद्धीबळ चॅम्पियनशीपचे जेतेपद पटकावले आहे.
कोनेरू हम्पीने रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. आज रविवारी (२९ डिसेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली.
रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्याची हम्पीची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तिने २०१९ मध्ये जॉर्जियामध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
कोनेरू हंपीचा हा विजय बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण आहे. नुकतेच डी.गुकेशने क्लासिकल फॉरमॅट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करून देशाचे नाव उंचावले होते.
३७ वर्षीय कोनेरू हंपीने ११ फेऱ्यांमध्ये एकूण ८.५ गुण मिळवून विजेतेपद पटकावले.
रॅपिड बुद्धिबळातील तिची कारकीर्द चमकदार आहे. तिने २०१२ मध्ये मॉस्को येथे कांस्य पदक आणि २०२२ मध्ये उझबेकिस्तान येथे रौप्य पदक जिंकले होते. तिचे सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ती जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू बनली आहे.
कोनेरू हंपीच्या या यशाने तिची कारकीर्द केवळ नवीन उंचीवर पोहोचली नाही तर भारतातील बुद्धिबळाला नवी ऊर्जा आणि प्रेरणाही दिली आहे. तिचा हा विजय भारताच्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंसाठी प्रेरणा ठरणार आहे.
संबंधित बातम्या