खो-खो या खेळाचा पहिला वर्ल्डकप भारतात खेळला जात आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर टीम इंडियाचा सामना पेरू संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने पेरूच्या संघाचा ७०-३८ अशा मोठ्या फरकाने पराभव करत स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साधली.
याआधी भारतीय संघाने नेपाळ आणि ब्राझीलला पराभूत केले आहे. यासह महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले असून स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
भारतीय संघाने पेरूविरुद्धच्या गटातीलख तिसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. टर्न एकच्या सुरुवातीलाच भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. टर्न दोन मध्ये पेरूने अल्पकाळ बचाव करून भारतासाठी काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखाली यजमान भारताने लवकरच पुन्हा एकदा सामन्यावर ताबा मिळवला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी ३६ गुणांसह पहिली फेरी पूर्ण केली.
आदित्य पोटे, शिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांनी चमकदार कामगिरी केली, त्यांच्यामुळे भारतीय संघाने खेळावर नियंत्रण ठेवले आणि तिसऱ्या टर्नपर्यंत वर्चस्व कायम ठेवले. चौथ्या टर्नवर खेळाडूंनी गुणसंख्या ७० गुणांवर नेली. या कालावधीत पेरूचा संघ केवळ ३८ गुण मिळवू शकला आणि भारताने ३२ गुणांच्या फरकाने सामना जिंकला. या शानदार विजयासह भारतीय संघाने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश केला असून आता या स्पर्धेतील विजेतेपदावर त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांचा ग्रुप स्टेजमध्ये अजून एक सामना बाकी आहे. हा सामना भूतान विरुद्ध शुक्रवारी (१६ जानेवारी) रात्री ८.१५ वाजता होणार आहे.
सध्या टीम इंडिया ३ सामन्यात ३ विजय मिळवून गटात अव्वल स्थानावर आहे. नेपाळ दुसऱ्या स्थानावर तर भूतान तिसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत एकूण ४ गट तयार करण्यात आले आहेत आणि प्रत्येकी २ संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणार आहेत. ग्रुप स्टेजनंतर १७ जानेवारीपासून प्लेऑफचे सामने सुरू होतील. तर अंतिम सामने १९ जानेवारीला होतील.
संबंधित बातम्या