मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Steve Smith IPL 2023 : गुजरात संघात स्टीव्ह स्मिथची एन्ट्री होणार? विल्यमसन आयपीएलमधून बाहेर

Steve Smith IPL 2023 : गुजरात संघात स्टीव्ह स्मिथची एन्ट्री होणार? विल्यमसन आयपीएलमधून बाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2023 03:28 PM IST

Steve Smith may Replace Kane Williamson : स्टीव्ह स्मिथ आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील होऊ शकतो. स्मिथ गुजरातचा जखमी फलंदाज केन विल्यमसनची जागा घेऊ शकतो.

Steve Smith IPL 2023
Steve Smith IPL 2023

kane williamson ruled out from ipl 2023 : आयपीएल 2023 चा थरार सुरू झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरुवात झाली. हा सामना गुजरात संघाने आपल्या नावावर केला.

स्मिथ विल्यमसनची जागा घेणार, चर्चेला उधाण

दरम्यान, आयपीएल 2023 च्या या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसन क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाला. विल्यमसन आयपीएलमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. आता विल्यमसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश होऊ शकतो. IPL 2023 साठी स्मिथ गुजरात टायटन्सचा भाग बनू शकतो.

सध्याच्या आयपीएल हंगामात स्टीव्ह स्मिथ समालोचक म्हणून उपस्थित आहे. पण आता, विल्यमसनच्या दुखापतीनंतर स्मिथ आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्समध्ये सामील होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएलच्या मिनी लिलावात स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड ठरला होता. स्मिथची बेस प्राईस २ कोटी रुपये होती.

विल्यमसनला दुखापत कशी झाली?

पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनला दुखापत झाली होती. डावातील १३व्या षटकात सीमारेषेवर षटकार वाचवताना विल्यमसनला गुडघ्याला दुखापत झाली. ३२ वर्षीय विल्यमसन या घटनेनंतर मैदानाबाहेर गेला आणि त्याने फलंदाजीही केली नाही. त्याच्या जागी साई सुदर्शनने इम्पॅक्ट फ्लेयर म्हणून संघात प्रवेश केला. विल्यमसन आयपीएलमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत स्मिथ त्याच्या जागी गुजरातचा भाग बनू शकतो, असे मानले जात आहे.

स्मिथला आयपीएलचा चांगला अनुभव

स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १०३ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ९३ डावांमध्ये फलंदाजी करताना स्मिथने २४८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आपल्या १ शतक आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या १०१ धावा आहे.

WhatsApp channel