एशियन गेम्स २०२३ मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी १०० हून अधिक पदकांची कमाई केली. भारताने पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० हून अधिक पदके जिंकली आहेत. चीनच्या हांगझोऊ येथे झालले्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण १०७ पदकांची कमाई केली. यात २८ सुवर्णपदक तर ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारताने कबड्डी महिलांच्या कबड्डी स्पर्धेतदेखील सुवर्ण पदक जिंकले. या संघात मराठमोठी कबड्डीपटू स्नेहल शिंदेचाही समावेश होता. स्पर्धेनंतर संघ भारतात परतला आहे. याप्रसंगीचा एक विमानतळावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्नेहल शिंदे आणि तिचे वडिल दिसत आहेत.
कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. सुवर्णपदक विजेत्या मुलीला पाहताच प्रदीप शिंदे यांना रडू कोसळले. प्रदीप शिंदे हे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. मुलगी स्नेहल आणि वडिल प्रदीप शिंदे यांचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताचा सामना चायनीज तैपेईसोबत झाला. या कठीण सामन्यात भारतीय संघाने २६-२५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकलेले हे तिसरे सुवर्णपदक ठरले. भारताने महिलांनी याआधी कबड्डीत २०१० आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर गेल्या एशियन गेम्समध्ये म्हणजेच २०१८ साली उपविजेतेपद पटकावले होते.