प्रो कबड्डी लीग २०२४ च्या १३व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यूपी वॉरियर्सचा ३२-२९ अशा फरकाने पराभव केला. बंगालचा या मोसमातील हा पहिला विजय आहे, तर यूपीला तीन सामन्यांत पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे.
बंगालच्या विजयात मनिंदर (८), पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या सुशील काबरेकर (७) आणि नितीन धनखर (७) यांनीे महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषत: सुशीलने दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली.
युपीच्या भरतने या सामन्यातही सुपर-१० लगावला पण तो आपल्या संघाला हंगामातील पहिल्या पराभवापासून वाचवू शकला नाही. भरतने पहिल्या रेडमध्ये लेफ्ट कव्हरची शिकार केली आणि नंतर दुसऱ्या रेडम्ध्ये फजलची शिकार करून बंगालला मोठा धक्का दिला. मनिंदरने पहिल्या रेडमध्ये बोनस घेतला आणि नंतर दुसऱ्या रेडमध्ये दोन गुण घेत बंगालला ३-२ ने आघाडीवर नेले.
त्यानंतर दोन्ही संघ ४-४ ने बरोबरीत आले. येथे नितीनने रेड करत दोन गुण घेत बंगालला ६-४ अशी आघाडी दिली. आठव्या मिनिटापर्यंत स्कोअर ७-६ असा बंगालच्या बाजूने होता पण यूपीने मनिंदरची शिकार करून ७-७ अशी बरोबरी करून घेतली.
ब्रेकनंतर सुशीलने करा किंवा मरोच्या रेडमध्ये उतरून दोन गुणांसह पुनरागमन केले. आता यूपीवर ऑलआऊटचा धोका होता. नितीनने उर्वरित दोन खेळाडूंना बाद करत बंगालला २५-१९ अशी आघाडी मिळवून दिली. ऑल-इननंतर, यूपीने सलग दोन गुणांसह पुनरागमन केले परंतु बंगालने त्याच गुणांसह त्याचा नाश केला.
मात्र, भरतने पुन्हा दोन गुणांची रेड करून यूपीच्या पुनरागमनाच्या आशा उंचावल्या. मात्र, बंगालने पुन्हा दोन गुण मिळवत ५ गुणांची आघाडी घेतली. भरत यूपीसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत होता. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर शेवटी फजलने भवानीची शिकार करत बंगालचा या मोसमातील पहिला विजय निश्चित केला.