‘किती वेळ बायकोकडं बघत राहणार’ असं म्हणणाऱ्या 'एल अँड टी'च्या अध्यक्षांना ज्वाला गुट्टानं सुनावलं!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘किती वेळ बायकोकडं बघत राहणार’ असं म्हणणाऱ्या 'एल अँड टी'च्या अध्यक्षांना ज्वाला गुट्टानं सुनावलं!

‘किती वेळ बायकोकडं बघत राहणार’ असं म्हणणाऱ्या 'एल अँड टी'च्या अध्यक्षांना ज्वाला गुट्टानं सुनावलं!

Jan 10, 2025 05:40 PM IST

Jwala Gutta on L&T chairman : लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस एन सुब्रमण्यन यांना त्यांच्या एका वक्तव्यामुळे प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. दीपिका पादूकोन नंतर आता बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टानेही सुब्रमण्यन यांना फैलावर घेतले आहे.

किती दिवस बायकोकडं बघत राहणार… ज्वाला गुट्टा संतापली, L&T कंपनीच्या मालकाला झापलं!
किती दिवस बायकोकडं बघत राहणार… ज्वाला गुट्टा संतापली, L&T कंपनीच्या मालकाला झापलं!

लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याची सूचना केली होती. घरात 'किती दिवस बायकोकडे बघत राहणार' असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही या प्रकरणावर सुब्रमण्यन यांना फैलावर घेतले होते. यानंतर आता प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिनेही सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर टीका केली असून त्यांचे वक्तव्य संतापजनक आणि भीतीदायक असल्याचे म्हटले आहे.

ज्वाला गुट्टा काय म्हणाली?

सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर ज्वाला गुट्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यासाठी तिनं 'एक्स'वर विशेष पोस्ट लिहिली आहे. ज्वालानं कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी तिचा रोख स्पष्ट आहे. 'मुळात लोकांनी (कर्मचाऱ्यांनी) आपल्या बायकोकडं का बघू नये? आणि बघायचंच असेल तर फक्त रविवारीच का?, असा खोचक प्रश्न ज्वालानं उपस्थित केला आहे. 

'इतके सुशिक्षित आणि मोठ्या संस्थांमध्ये उच्च पदांवर असलेले लोक मानसिक आरोग्य आणि मानसिक विश्रांती गांभीर्यानं घेत नाहीत याची खंत वाटते. कधीकधी विश्वास बसत नाही. त्यातून मग ते अशी चुकीची (स्त्रियांबद्दल भेदभाव करणारी) विधानं करतात आणि स्वतःच्या मूर्खपणाचं जाहीर प्रदर्शन करतात. हे निराशाजनक आणि भीतीदायकही आहे, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे.

एस एन सुब्रमण्यन काय म्हणाले होते?

एस एन सुब्रमण्यन यांनी अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्यास आणि ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवण्यास सांगितले होते. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विचारले, 'घरी बसून काय करता काय? किती वेळ तुम्ही तुमच्या बायकोकडे बघत राहणार? चला, ऑफिसला या आणि काम करा. 

ते पुढे म्हणाले, 'जर तुम्हाला जगात टॉपवर पोहोचायचे असेल तर तुम्हाला आठवड्यातून ९० तास काम करावे लागेल. पुढे जात रहा मित्रांनो".

कंपनी सुब्रमण्यन यांच्या बचावासाठी पुढे आली

एकीकडे सुब्रमण्यन यांना त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, L&T त्यांच्या मदतीला धावून आली आहे. L&T ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आठ दशकांहून अधिक काळ, आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. पुढची १० वर्षे भारताची आहेत असा आमचा विश्वास आहे.

ज्यामध्ये देशाचा विकास करून त्याला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. आमच्या अध्यक्षांनी दिलेल्या निवेदनातून ही महत्त्वाकांक्षा दिसून येते. त्यांची कमेंट असाधारण परिणाम साध्य करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे यावर जोर देते. L&T मध्ये अशा संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत'.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग