भारताचे प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी पॅरिस ऑलिम्पिक संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूला त्यांनी एमजी विंडसर कार भेट देणार असल्याची घोषणा केली आहे.
जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांनी X वर याची घोषणा केली. ते म्हणाले, "आमचे सर्वोत्तम खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी पात्र आहेत याचा आनंद आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. २२ वर्षीय मनू भाकरने यापूर्वी १० मीटर एअर पिस्तूलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. यानंतर मनूने सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत आणखी एक कांस्य जिंकले होते.
यानंतर तिसरे पदक ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये स्वप्नील कुसळेने पटकावले. म्हणजेच या तिन्ही खेळाडूंना ही आलिशान कार मिळणार हे निश्चित आहे.
विशेष म्हणजे, मॉरिस गॅरेज इंडियाने JSW समूहाच्या सहकार्याने नवीन CUV MG Windsor कारची घोषणा केल्यानंतर जिंदाल यांची ही पोस्ट आली आहे.
एमजी म्हणाले, की या कारचे डिझाइन विंडसर कॅसल (विंडसर, बर्कशायर काउंटी, इंग्लंड येथे स्थित एक शाही किल्ला) पासून प्रेरित आहे. एमजी विंडसर हे उत्कृष्ट कारागिरी आणि रॉयल्टीचे प्रतीक मानले जाते.
यूके स्थित कंपनीने असा दावा केला आहे की या कारची रचना उत्कृष्ट आहे आणि ती बनवताना अत्यंत काळजी घेण्यात आली आहे.
जिंदाल यांची पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "अशा अप्रतिम भेटवस्तूबद्दल आमच्या ऑलिंपियनला सलाम! सज्जन जिंदाल आणि जेएसडब्ल्यू.
तसेच, दुसऱ्या एकाने लिहिले, की व्वा..! खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चांगला उपक्रम.
JSW ग्रुप हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचा अधिकृत जर्सी स्पॉन्सरदेखील आहे.