पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नवनवीन वाद निर्माण होत राहिले. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप सुरू असून, त्यावर १३ ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे.
दरम्यान, अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चाइल्स हीदेखील ऑलिम्पिक स्पर्धेतील खराब नियमांचा बळी ठरली आहे. खरं तर, विनेश फोगटप्रमाणेच, हे प्रकरण देखील CAS पर्यंत पोहोचले आहे. अवघ्या ४ सेकंदांच्या विलंबामुळे जॉर्डन चाइल्सकडून पदक हिसकावण्यात आले.
महिलांच्या जिम्नॅस्टिक्समधील फ्लोर एक्सरसाईज स्पर्धेत रोमानियाच्या अना बार्बोसू हिला कांस्यपदक विजेते घोषित करण्यात आले. पण अमेरिकन गोटातून या निर्णयािविरोधात तातडीने अपील केले. तपासाअंती तेथे उपस्थित पंचांनी अमेरिकन ॲथलीट जॉर्डन चिलीसचा स्कोअर ०.१ ने वाढवला होता. हे तिला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले. परंतु रोमानियाच्या वतीने CAS मध्ये खटला दाखल करण्यात आला.
प्रकरण CAS पर्यंत पोहोचल्यानंतर तेथे बराच वेळ सुनावणी चालली. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॅम्पने केलेले अपील १ मिनिट आणि ४ सेकंदांनंतर आले होते. तर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या नियमांनुसार, खेळाडू आणि त्यांच्या संघाला एका मिनिटात अपील करावे लागते.
अपीलमध्ये अवघ्या ४ सेकंदांच्या विलंबामुळे, सीएएसने जॉर्डन चाइल्सकडून पदक हिसकावून घेतले आणि रोमानियाच्या अना बार्बोसूला कांस्यपदक विजेते घोषित केले.
यूएस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समिती (USOPC) ने आता दावा केला आहे की त्यांच्याकडे पुरावा म्हणून एक व्हिडिओ आहे, यात यूएस प्रशिक्षकाने १ मिनिटापूर्वी अपील केले होते.
यूएस जिम्नॅस्टिक संघाचे मुख्य प्रशिक्षक सेसिल लँडी यांनी स्कोअर पोस्ट केल्यानंतर ४७ सेकंदांनी पहिले अपील केले, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मूळ स्कोअर पोस्ट केल्यानंतर ५५ सेकंदात लँडीने दुसरे अपील केले. एका मीडिया रिपोर्टनुसार, यूएस ऑलिम्पिक समिती स्वित्झर्लंड ट्रिब्युनल कोर्टात हा मुद्दा उपस्थित करू शकते.