मराठी बातम्या  /  क्रीडा  /  JIO Cinema : 'जीओ सिनेमा' पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे; आयपीएलचं काय?

JIO Cinema : 'जीओ सिनेमा' पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे; आयपीएलचं काय?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2023 10:17 AM IST

JIO Cinema Paid Subscription : जिओ सिनेमा या अॅपवर काहीही पाहण्यासाठी यापुढं पैसे मोजावे लागणार आहेत.

JIO Cinema
JIO Cinema

IPL on Jio Cinema : आयपीएलचा १६ वा सीझनचे क्रिकेट सामने जिओ सिनेमावर मोफत दिसत असल्यानं सध्या सर्वत्र जिओचा बोलबाला आहे. एक पैसाही खर्च न करता मॅच पाहता येत असल्यानं जिओ सिनेमानं प्रेक्षकांच्या संख्येचे सर्व विक्रम मोडले आहेत. मात्र, ही चंगळ लवकरच बंद होणार आहे. कारण, जिओ सिनेमावर काहीही पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जिओ सिनेमा पाहण्यासाठी पेड सबस्क्रिप्शन आणण्याचा विचार रिलायन्स जिओ करत आहे.

Jio Cinema हा अॅप आधारित डिजिटल कंटेंट प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म युजर्ससाठी सध्या तरी विनामूल्य आहे. केवळ मोबाईलमध्ये जिओ रिचार्ज एवढीच जिओ सिनेमा पाहण्याची एक अट आहे. तो असल्यास प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करून चित्रपट, मालिका, बातम्या, संगीत आणि क्रिकेटचा आनंद विनामूल्य घेता येतो. सध्या जिओ सिनेमावर आयपीएलचंही प्रसारण केलं जात आहे. त्यामुळं जिओच्या ग्राहकांची संख्या सातत्यानं वाढत आहे.

जिओच्या या चकटफू सेवेमुळं अन्य कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्या विरोधात एअरटेलनं ट्रायकडं (दूरसंचार नियामक प्राधिकरण) धाव घेतली होती. जिओमुळं डीटीएच संपण्याच्या मार्गावर आहे. डीटीएचवर मॅच पाहण्यासाठी १९ रुपये घेतले जातात. मात्र, जिओ ते फुकट दाखवते. हे नियमांचं उल्लंघन आहे. ब्रॉडबँड व डिजिटल अॅपसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी एअरटेलनं केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर आता जिओ सिनेमाही सशुल्क होणार आहे. जिओला Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि इतर OTT प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करायची आहे. त्यामुळं ग्राहकांकडून शुल्क घेतानाच कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर १०० हून अधिक नवीन चित्रपट आणि वेब मालिका देखील जोडणार आहे.

२८ मे नंतर सशुल्क?

आयपीएल स्पर्धेतील शेवटचा सामना २८ मे २०२३ रोजी होणार आहे. त्यानंतरच JioCinema शुल्क आकारण्यास सुरुवात करेल, असं बोललं जात आहे. कंपनीच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेस प्रेसिडेंट ज्योती देशपांडे यांनी ब्लूमबर्गला याबाबत माहिती दिली. जिओ सिनेमावर १०० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिका दाखवण्याची योजना आहे. अर्थात, सबस्क्रिप्शन नेमकं किती असेल, हे अद्याप ठरलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

WhatsApp channel

विभाग