मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs LSG : धोनीने लागोपाठ दोन सिक्सर लगावले अन् प्रेक्षकांची संख्या वाढली, जिओ सिनेमाचा नवा विक्रम

CSK vs LSG : धोनीने लागोपाठ दोन सिक्सर लगावले अन् प्रेक्षकांची संख्या वाढली, जिओ सिनेमाचा नवा विक्रम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 04, 2023 03:10 PM IST

CSK vs LSG IPL 2023 : मार्क वुडच्या अखेरच्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनीने लागोपाठ दोन सिक्स लगावताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

MS Dhoni IPL 2023 News
MS Dhoni IPL 2023 News (PTI)

MS Dhoni IPL 2023 News : चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईनं बाजी मारत आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. तर पहिल्या सामन्यात दिल्लीला हरवल्यानंतर लखनौला दुसऱ्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. परंतु आता काल झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाजीला येत महेंद्रसिंह धोनीनं चांगलीच कमाल केली आहे. घातक गोलंदाजी करणाऱ्या मार्क वुडला धोनीने लागोपाठ दोन सिक्स मारत नवा विक्रम केला आहे. यंदाची आयपीएल ही जिओ सिनेमावर दाखवली जात आहे. त्यामुळं महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला येताच जिओ सिनेमावर प्रेक्षकांची झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

चेन्नईची फलंदाजी सुरू असताना जडेचा आऊट झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा जिओ सिनेमावर तब्बल १.६ कोटी प्रेक्षक मॅच पाहत होते. याशिवाय त्याच दिवशी कोट्यवधी लोकांनी जिओ सिनेमा डाऊनलोड करून त्यावर धोनीच्या फलंदाजीचा आनंद लुटला. आयपीएलच्या गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

MS Dhoni IPL 2023
MS Dhoni IPL 2023 (HT)

जिओ सिनेमावर आतापर्यंत तब्बल १४७ कोटी प्रेक्षकांनी आयपीएलचे सामने पाहिले आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारी होणाऱ्या सामन्यांना सर्वाधिक युजर्स असल्याचं दिसून येत आहे. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या खेळाडूंची फलंदाजी पाहण्यासाठी देखील अनेक युजर्स जिओ सिनेमावर येत आहेत.

जिओ सिनेमावर मराठीतही कॉमेंट्री...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हिंदी आणि इंग्रजीसह मराठी भाषेतही कॉमेंट्री सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील लोकांना आपल्या मातृभाषेत आयपीएल सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. मराठी भाषेशिवाय गुजराती, भोजपुरी, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, ओरिया आणि मल्याळम भाषेतील कॉमेंट्रीचा प्रेक्षकांना सामन्यांचा आनंद लुटता येत आहे. त्यामुळं जास्तीत जास्त प्रेक्षक जिओ सिनेमा पाहत असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

WhatsApp channel