मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jaydev Unadkat : असा विक्रम नावावर होणं कुणाला आवडेल?; जयदेव उनाडकट सोबत काय झालं पाहा!

Jaydev Unadkat : असा विक्रम नावावर होणं कुणाला आवडेल?; जयदेव उनाडकट सोबत काय झालं पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 22, 2022 12:39 PM IST

Jaydev Unadkat in Team India : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

Jaydev Unadkat
Jaydev Unadkat

India Vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मीरपूर इथं सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला संधी मिळाली आहे. तब्बल १२ वर्षांनंतर उनाडकट याचं कसोटी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झालं आहे. त्यामुळं उनाडकटच्या नावावर एका अनोख्या जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी पुनरागमनासाठी सर्वाधिक वाट पाहणाऱ्यांच्या यादीत त्यानं दुसरं स्थान पटकावलं आहे. याआधी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा या यादीत होता.

जयदेव उनाडकट यानं १६ डिसेंबर २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याचा पहिला कसोटी सामना खेळला होता. मागची तब्बल १२ वर्षे त्याचा हा एकमेव कसोटी सामना ठरला होता. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत राहिला, पण त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकलं नाही. उनाडकट यानं खेळलेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघानं आतापर्यंत ११८ कसोटी सामने खेळले. इतकी वर्षे उनाडकट वेटिंगवर होता. अखेर आता त्याला संघात स्थान मिळाले आहे.

उनाडकट याच्या आधी दिनेश कार्तिक यांच्याही संयमाची अशीच कसोटी लागली होती. दिनेश कार्तिक हा २०१० साली कसोटी सामने खेळला होता. त्यानंतर तो बाहेर गेला, तो तब्बल ८ वर्षे पुनरागमनाची वाट पाहत होता. अखेर ८७ सामन्यांनंतर त्याला संघात संधी मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सर्वाधिक वाट पाहणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा गॅरेथ बॅटी पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला २००५ ते २०१६ या कालावधीत तब्बल १४२ कसोटी सामन्यांसाठी बाहेर बसावं लागलं होतं.

सर्वाधिक काळ वाट पाहावे लागलेले खेळाडू

गॅरेथ बॅटी (२००५-२०१६) - १४२ सामने

जयदेव उनाडकट (२०१०-२०२२) - ११८ सामने

मार्टिन बिकनेल (१९९३-२००३) - ११४ सामने

फ्लॉइड रेफर (१९९९-२००९) - १०९ सामने

युनूस अहमद (१९६९-१९८७) - १०४ सामने

डेरेक शॅकलटन (१९५१-१९६३) - १०३ सामने

 

 

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन) : नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन (क), नुरुल हसन (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, तस्किन अहमद

भारत (प्लेइंग इलेव्हन) : केएल राहुल (क), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज

WhatsApp channel