
Javed miandad on Asia Cup : भारत-पाकिस्तान संघातील क्रिकेट सामन्यांना कडवट स्वरूप देण्यास एकेकाळी हातभार लावणारे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आता भारतीय राजकारणावरही बोलू लागले आहेत. मियाँदाद यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. 'मोदी हे पूर्णपणे वेगळ्या दिशेनं चालले असून एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा काढतील, असं मियाँदाद बरळले आहेत.
आशिय कप स्पर्धेच्या आयोजनावर सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू आहे. आशिया कप २०२३ चं यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे, पण भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नाही. या स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. याउलट २०२३ चा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भारतात यावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मियाँदाद यांनी आपलं मत व्यक्त केलं.
'पाकिस्तान क्रिकेट भारतीय क्रिकेटपेक्षा चांगलं आणि प्रभावी असल्याचा दावा मियाँदादनं केला. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळायला येत नाही तोपर्यंत पाकिस्ताननं भारतात क्रिकेट खेळायला जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे.
‘माझ्या हातात असेल तर मी भारतात जाण्यास नकार देईन. आम्ही याआधीही भारतात खेळून आलोय. आता भारताची पाळी आहे. जोपर्यंत भारत आमच्याकडं येत नाही, तोपर्यंत पाकिस्ताननंही जाऊ नये असं मला वाटतं. पूर्वी दोन्ही संघ एकमेकांच्या देशात जायचे, पण भारतीय क्रिकेट बोर्ड चुकीच्या पद्धतीनं वागतंय. विशेषत: मोदींनी सगळं उद्ध्वस्त केलंय. त्यांना देशही उद्ध्वस्त करायचा आहे, असं ते म्हणाले. 'आपण शेजारी बदलू शकत नाही किंवा त्यांना संपवूही शकत नाही. मोदी जे करतायत ते दोन्ही देशांसाठी घातक आहे, असं मियाँदाद म्हणाले.
'खेळ ही दोन देशांना जोडणारी गोष्ट आहे. त्यातून लोक जवळं येतात व नातं निर्माण होतं. त्यामुळंच भारत पाकमध्ये येऊन आमच्यासोबत खेळत नाही, तोपर्यंत आम्हाला तिथं जाऊन खेळण्याची गरज नाही. भारतापेक्षा पाकिस्तानी क्रिकेट वरचढ आहे. आम्हाला तुमची फिकीर नाही. नरकात जा, आम्हाला काही फरक पडत नाही, अशी मुक्ताफळंही मियाँदाद यांनी उधळली.
संबंधित बातम्या
