मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Injury: विराट उर्वरित मालिकेत खेळणार का? बुमराहने दिली माहिती

Virat Kohli Injury: विराट उर्वरित मालिकेत खेळणार का? बुमराहने दिली माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 13, 2022 11:57 AM IST

जसप्रीत बुमराहने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याविषयी मोठी अपडेट दिली आहे. विराट हॅमस्ट्रिंगमुळे पहिल्या वनडेत खेळू शकला नव्हता.

bumrah
bumrah

टीम इंडियाने पहिला वनडे सामना १० विकेट्सनी जिंकला आहे. इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्याचा हिरो ठरला तो जसप्रीत बुमराह. त्याने अवघ्या १९ धावा देत इग्लंडचे ६ महत्वाचे फलंदाज बाद केले. या सामन्यानंतर बुमराहने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याविषयी मोठी अपडेट दिली आहे. विराट हॅमस्ट्रिंगमुळे पहिल्या वनडेत खेळू शकला नव्हता.

जसप्रीत बुमराह म्हणाला की, "मला दुखापत किती गंभीर आहे, हे माहित नाही. कारण मी शेवटच्या टी-२० सामन्यात खेळलो नव्हतो. मात्र, मला पूर्ण आशा आहे की, तो पुढच्या सामन्यापर्यंत नक्की ठीक होईल".

तसेच, बुमराहला शमी आणि त्याच्या जोडीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “जेव्हा मी आणि शमी एकत्र गोलंदाजी करतो, तेव्हा आमच्यात नेहमीच संवाद होत असतो. आज चेंडू चांगला स्विंग होत होता. शमी एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या सोबत गोलंदाजी करायला नेहमीच मजा येते”.  दरम्यान, शमीने सामन्यात तीन गडी बाद करुन बुमराहला उत्तम साथ दिली. 

बुमराहच्या नावावर खास रेकॉर्ड-

पहिल्याच वनडे सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडची दाणादाण उडवली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांत अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. यादरम्यान बुमराहने एक विशेष कामगिरी केली.

बुमराहने सामन्यात अवघ्या १९ धावा देत ६ गडी बाद केले. विशेष म्हणजे त्याने पहिले ४ विकेट हे सुरुवातीच्या ८ षटकांमध्येच घेतले होते.

बुमराह २००२ नंतर वनडेच्या पहिल्या १० षटकात ४ विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्गमध्ये श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. दहा वर्षांनंतर २०१३ मध्ये भुवनेश्वर कुमारने पोर्ट ऑफ स्पेन येथे श्रीलंकेविरुद्ध सुरुवातीच्या १० षटकांत ४ विकेट घेतल्या होत्या.

WhatsApp channel