मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC 2022: जिथं जातात तिथं मनं जिंकतात, जपानी लोकांच्या 'या' कृतीचं होतंय जगभरातून कौतुक

FIFA WC 2022: जिथं जातात तिथं मनं जिंकतात, जपानी लोकांच्या 'या' कृतीचं होतंय जगभरातून कौतुक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 25, 2022 11:52 AM IST

Japanese Football Team Fans Clean Stadium: कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात जपानने संपूर्ण जगाची मनं जिंकली आहेत. संघ आणि त्यांच्या चाहत्यांनी फिफाच्या मंचावर जगाला स्वच्छतेचा धडा शिकवला आहे. जपानच्या खेळाडूंनी आधी आपल्या खेळाने सर्वांनी प्रभावित केले. त्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांनी आपल्या एका कृत्याने संपूर्ण जग जिंकले.

Japanese Football Team Fans Clean Stadium
Japanese Football Team Fans Clean Stadium

फिफा विश्वचषक २०२२ हा आतापर्यंतच्या चढ-उतारांचा विश्वचषक राहिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोन मोठे अपसेट झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही अपसेट आशियाई संघांनी केले आहेत. प्रथम सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा पराभव करून सर्वांनाच चकित केले. यानंतर जपानने जर्मनीवर ऐतिहासिक विजय नोंदवला. जपान हाफ टाईमपर्यंत ०-१ ने पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्यांनी बलाढ्य जर्मनीला २-१ ने पराभूत करून इतिहास रचला.

२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात जपानच्या खेळाडूंनी प्रथम आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली, त्यानंतर जपानच्या चाहत्यांनी आपल्या चांगल्या सवयींनी संपूर्ण जगाला वेड लावले. सामना संपल्यानंतर सर्व चाहते स्टेडियममधून बाहेर पडले, पण जपानी चाहते मात्र मैदानातच थांबले. त्यांनी निळ्या कचऱ्याच्या पिशव्या काढल्या आणि त्यात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि स्टेडियममधील अन्न आणि इतर कचरा टाकून भरण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच संपूर्ण स्टेडियम पुन्हा चकचकीत झाले.

Japanese Football Team Fans Clean Stadium
Japanese Football Team Fans Clean Stadium

जपानच्या खेळाडूंचे आणि चाहत्यांचे कौतुक करताना फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था फिफाने बुधवारी रात्री एक फोटो आणि व्हिडिओदेखील पोस्ट केला. फोटोमध्ये जपानची टीम रूम एकदम नीटनेटकी आणि स्वच्छ दिसत आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये जपानी चाहते सामन्यानंतर स्टेडियमची स्वच्छता करताना दिसत आहेत. या पोस्टनंतर सोशल मीडियावर जपानी लोकांचे जोरदार कौतुक होत आहे.

Japanese Football Team Fans Clean Stadium
Japanese Football Team Fans Clean Stadium

४ वेळचे वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीवरच्या ऐतिहासिक विजयानंतर, जपानी खेळाडूंनी संघाची खोली स्वच्छ केली आणि अरबी भाषेत धन्यवाद लिहिलेले एक कार्डदेखील खोलीत सोडले. हा फोटो पोस्ट करत फिफाने लिहिले की 'जर्मनीच्या ऐतिहासिक विजयानंतर जपानी चाहत्यांनी स्टेडियम स्वच्छ केले. तर जपानच्या संघाने खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमच्या टीम रूमची अशी साफसफाई केली".

४ वर्षांपूर्वीदेखील जपानी चाहत्यांनी असेच केले होते

४ वर्षांपूर्वीदेखील असेच काहीसे घडले होते. २०१८ मध्ये रशियात फिफा वर्ल्डकप झाला होता. त्यावेळी देखील जपानी चाहत्यांनी स्टेडियममधील कचरा साफ केला होता.

यात विशेष काहीच नाही- जपानी चाहता

जगाला वाटते की ही एक मोठी गोष्ट आहे. पण जपानी लोकांसाठी ही एक साधी बाब आहे. अल जझीराशी बोलताना एका जपानी चाहत्याने सांगितले की,-'तुम्हाला यात काय विशेष वाटते, ती आमच्यासाठी सामान्य गोष्ट आहे. आम्ही हे करत राहतो. जेव्हा आपण शौचालय वापरतो तेव्हा आपण ते स्वतः स्वच्छ करतो. खोलीतून बाहेर पडल्यावर आम्ही तेच करतो. ही आमची प्रथा आहे. जागा साफ केल्याशिवाय आपण सोडू शकत नाही. हा आपल्या दैनंदिन शिक्षणाचा भाग आहे".

WhatsApp channel

संबंधित बातम्या