प्रो कबड्डी लीग २०२४ मधील तमिळ थलायवास आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामना टाय झाला. जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलायवास यांच्यातील सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. या सामन्याने रोमहर्षकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सुरुवातीला जयपूरचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण सचिन तन्वरने आपले रेड आणि डिफेंन्सच्या जोरावर संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
तामिळ थलायवासचा नरेंद्र कंडोला या सामन्यात काही खास करून शकला नाही आणि त्याला केवळ तीन गुण घेता आले. मात्र, पीकेएलचा सर्वात महागडा खेळाडू सचिन तन्वर याने थलायवाससाठी ११ गुण कमावले.
या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सच्याही सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अर्जुन देशवालने ७, विकास कंडोलाने ६, अंकुश राठीने ४ आणि सुरजीत सिंग आणि रजा मीरबाघेरीने प्रत्येकी ३ गुण मिळवले.
जयपूर पिंक पँथर्सची सुरुवात चांगली झाली कारण त्यांनी तमिळ थलायवासविरुद्ध सुरुवातीलाच आघाडी घेतली. मागील सामन्यातील अपयश विसरून अर्जुन देशवाल या सामन्यात चांगली कामगिरी करत होता. पहिल्या १० मिनिटांत, जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलायवासला ऑलआउट केले.
जयपूरसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सामन्यात विकास कंडोलाने चमकदार कामगिरी केली. गेल्या दोन सामन्यांत तो फ्लॉप ठरला होता. पण या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. अर्जुन देशवाल पुन्हा एकदा अडचणीत दिसला. गेल्या सामन्यातील त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, असे वाटत होते. पूर्वार्धात जयपूर संघ पुढे होता आणि स्कोअर २१-१६ असा त्यांच्या बाजूने होता.
नरेंद्र कंडोला या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. याच कारणामुळे उत्तरार्धात तमिळ थलायवासने चंद्रन रंजितला मॅटवर उतरवले. पण थलायवाससाठी अडचण अशी होती की केवळ अभिषेक मानकरन हाच डिफेन्समध्ये गुण मिळवत होता. तर आमिर हुसेन, कर्णधार साहिल गुलिया आणि नितेश कुमार यांच्यासारखे खेळाडू विशेष काही करू शकले नाहीत.
सचिन तन्वर रेडिंगमधून गुण मिळवत होता पण त्यापेक्षा त्याला जास्त टॅकल मिळत होते. त्यामुळे जयपूर पिंक पँथर्सची आघाडी कायम राहिली. मात्र, काही मिनिटांतच सामन्याचे चित्र पालटले. जयपूरला शेवटची रेड करायची होती आणि ते एका गुणाने पुढे होते. त्यांच्या वतीने रिझा मीरबाघेरी ही रेड करण्यासाठी गेला. त्याला फक्त वॉक लाईन क्रॉस करायची होती पण तो ती करू शकला नाही. सचिनने त्याला टॅकल केले आणि सामना टाय झाला.
संबंधित बातम्या