CSK: धोनीनंतर 'हा' युवा खेळाडू संभाळणार सीएसकेची धुरा; अंबाती रायडूची भविष्यवाणी
CSK Next Skipper: चेन्नईचा यशस्वी कर्णधार धोनीनंतर संघाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर सोपवली जाऊ शकते, याबाबत अंबाती रायडूने वक्तव्य केले.
Ambati Rayudu: चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२३ नंतर धोनी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम लावणार, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार की नाही? याबाबत सस्पेन्स कायम आहे. परंतु, धोनीनंतर चेन्नईच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न चाहत्यांसमोर पडला. यादरम्यान, माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने चेन्नईच्या संघाच्या कर्णधारापदाच्या शर्यतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बिहाइंडवुड्सटीव्हीच्या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत अंबाती रायडू म्हणाला की, “ऋतुराज गायकवाड युवा क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे एक दशकाहून अधिक काळ चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी आहे. धोनीने त्याला चांगल्या पद्धतीने तयार केले आहे. भारतीय संघही त्याचा पुरेपूर वापर करेल, तो तिन्ही फॉरमेटमध्ये खेळणारा खेळाडू आहे”, असे अंबाती रायडूने म्हटले आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी संघात समावेश केल्यानंतर ऋतुराजची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याबरोबरच गायकवाडने महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्वही केले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गायकवाडने ५०० हून अधिक धावा केल्या.
रुतुराज गायकवाडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक एकदिवसीय आणि नऊ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. एकमेक एकदिवसीय सामन्यात त्याला १९ धावा करता आल्या. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १६.८८ च्या सरासरीने १३५ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएल २०२० पासून ऋतुराज गायकवाडने ५२ सामन्यात ३९.०७ च्या सरासरीने १ हजार ७९७ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.