Indian premier league final : भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय ठरलेल्या आयपीएलचा (IPL) सोळावा सीझन संपण्यासाठी अवघे दोन सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलचा दुसरा सामना उद्या, शुक्रवारी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार आहे. मात्र, चर्चा अंतिम सामन्याची व विजेत्याचीच आहे. अंतिम सामन्याचा निकाल काहीही लागला तरी यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.
आयपीएलच्या जेतेपदाच्या शर्यतीत तीन संघ आहेत. पैकी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आधीच फायनलमध्ये धडक दिली आहे. तर, गुजरात व मुंबईपैकी फायनलमध्ये कोण जाणार याचा फैसला उद्या होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ २८ मे रोजी धोनीच्या सीएसकेशी भिडणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्स स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आयपीएलला नवीन चॅम्पियन मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कारण, प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांपैकी LSG हा एकमेव संघ असा होता, त्यानं कधीही विजेतेपद पटकावलेलं नाही. मात्र, एलिमिनेटर सामन्यात मुंबईनं लखनऊला हरवत त्यांना परतीचं तिकीट काढायला लावलं. जेतेपदाच्या शर्यतीत अजूनही कायम असलेल्या मुंबई, चेन्नई आणि गुजरात या तिन्ही संघांनी यापूर्वी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.
मागील तीन स्पर्धांमध्ये या तिन्ही संघांनी एकेकदा विजेतेपद पटाकवलं आहे. २०२० मध्ये मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद जिंकलंय. २०२१ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा चॅम्पियन बनला. तर, २०२२ मध्ये गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या वर्षातच जेतेपद पटकावून सर्वांना धक्का दिला. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा तिन्ही संघाचा प्रयत्न असेल.
आयपीएल स्पर्धेत आजवर अनेक संघ सहभागी झाले आहेत, त्यापैकी सध्या खेळत असलेल्या चार संघांना एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.