LSG vs SRH highlights : लखनौचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय, हैदराबादचा ५ विकेट्सनी पराभव
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs SRH highlights : लखनौचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय, हैदराबादचा ५ विकेट्सनी पराभव

LSG vs SRH highlights : लखनौचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय, हैदराबादचा ५ विकेट्सनी पराभव

Apr 07, 2023 06:58 PM IST

LSG Vs SRH IPL highlights 2023 : आयपीएल 2023चा दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौने ५ विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा सलग दुसरा पराभव आहे. तर लखनौचा तीन सामन्यातील दुसरा विजय आहे.

ipl 2023 lsg vs srh live score
ipl 2023 lsg vs srh live score

IPL Cricket Score, LSG vs SRH Indian Premier League 2023 : लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौकडून कृणाल पांड्याने चमकदार कामगिरी केली.

ipl 2023 lsg vs srh score updates

लखनौचा शानदार विजय

 लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौकडून कृणाल पांड्याने चमकदार कामगिरी केली.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. हैदराबादचा संघ २० षटकांत ८ विकेट गमावत केवळ १२१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ षटकांत ५ गडी गमावून १२७ धावा करून सामना जिंकला.

लखनौसाठी निकोलस पूरनने षटकार मारून सामना संपवला. त्याने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नटराजनला षटकार ठोकला. सहा चेंडूत ११ धावा करून तो नाबाद राहिला. मार्कस स्टॉइनिसने १३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. हैदराबादकडून आदिल रशीदने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

मेयर्स आणि दीपक हुडाची बॅट चालली नाही

सलग दोन सामन्यात अर्धशतके झळकावणाऱ्या काइल मेयर्सला या सामन्यात काही खास करता आले नाही. तो १४ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. तो फजलहक फारुकीच्या चेंडूवर मयंक अग्रवालकरवी झेलबाद झाला. दीपक हुडा आठ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. भुवनेश्वरने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा अप्रतिम झेल घेतला.

४५ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर सनरायझर्स संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते, परंतु कर्णधार केएल राहुलने कृणाल पांड्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५५ धावांची भागीदारी केली. क्रुणाल २३ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. केएल राहुलला सामना पूर्ण करता आला नाही. संघ विजयापासून ८ धावा दूर असताना तो आदिल रशीदच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. राहुलने ३१ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने चार चौकार मारले. रोमारियो शेफर्ड खाते उघडू शकला नाही. त्यालाही आदिल रशीदने बाद केले.

ipl 2023 lsg vs srh live score : कृणाल पांड्या बाद 

उमरान मलिकने लखनौ सुपर जायंट्सला तिसरा धक्का दिला. त्याने क्रुणाल पांड्याला १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक अनमोलप्रीत सिंगकरवी झेलबाद केले. क्रुणालने २३ चेंडूत ३४ धावा केल्या.

ipl 2023 lsg vs srh live score : लखनौची वेगवान सुरुवात

१२२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपरजायंट्सने पहिल्या षटकात १३ धावा केल्या. काईल मेयर्स आणि कर्णधार राहुल ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. दोघेही चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. दोन षटकांनंतर लखनौची धावसंख्या बिनबाद २४ आहे.

ipl 2023 lsg vs srh live score : लखनौला मिळाले सोपे लक्ष्य 

लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादने सोपे लक्ष्य दिले आहे. हैदराबादने २० षटकांत आठ गडी गमावून १२१ धावा केल्या. लखनौला १२२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीने ४१ चेंडूत सर्वाधिक ३५ धावा केल्या. अनमोलप्रीत सिंगने २६ चेंडूत ३१ धावा केल्या. तर अब्दुल समद १० चेंडूत २१ धावा करून नाबाद राहिला. वॉशिंग्टन सुंदरने २८ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले.

सनरायझर्स हैदराबादचे प्रथमच कर्णधारपद भूषवणाऱ्या एडन मार्करामला खातेही उघडता आले नाही. मयंक अग्रवाल ८ , हॅरी ब्रूक ३ आणि आदिल रशीद ४ धावा करून बाद झाले. उमरान मलिक खाते न उघडताच धावबाद झाला. लखनौच्या फिरकीपटूंची अप्रतिम कामगिरी. त्यांनी सहा विकेट घेतल्या. यामध्ये कृणाल पांड्याला तीन आणि अमित मिश्राला दोन यश मिळाले. रवी बिश्नोईने एक विकेट घेतली. वेगवान गोलंदाज यश ठाकूरला एक विकेट मिळाला.

ipl 2023 lsg vs srh live score : सनरायझर्सला चौथा धक्का 

रवी बिश्नोईने सनरायझर्स हैदराबादला चौथा धक्का दिला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने हॅरी ब्रूकला बाद केले. ब्रूकला यष्टिरक्षक निकोलस पूरनने यष्टिचित केले. त्याला चार चेंडूत केवळ ३ धावा करता आल्या. सनरायझर्सने नऊ षटकांत चार गडी बाद ५५ धावा केल्या आहेत.

ipl 2023 lsg vs srh live score : हैदराबादला सलग दोन

कृणाल पंड्याने आठव्या षटकात हैदराबादला सलग दोन धक्के दिले. त्याने पाचव्या चेंडूवर अनमोलप्रीत सिंगला एलबीडब्ल्यू केले. अनमोलप्रीत २६ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. 

त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला सनरायझर्सचा नवा कर्णधार एडन मार्कराम खाते न उघडताच बाद झाला. तो पहिल्याच चेंडूवर तो कृणालचा बळी ठरला. कृणालने त्याला क्लीन बोल्ड केले. सनरायझर्सने आठ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ५० धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठीसोबत हॅरी ब्रूक क्रीजवर आहे.

ipl 2023 lsg vs srh live score : हैदराबादची पहिली विकेट पडली

हैदराबादची पहिली विकेट मयंक अग्रवालच्या रूपाने पडली. तो ८ धावा करून बाद झाला. कृणाल पांड्याने त्याला आपली शिकार बनवले.

ipl 2023 lsg vs srh live score : दोन्ही संघ

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई

ipl 2023 lsg vs srh live score : हैदराबाद फलंदाजी करणार

सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ प्रथम गोलंदाजी करेल. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या