मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : कायरन पोलार्ड यंदा आयपीएलच्या मैदानावर नसेल, पण…

IPL 2023 : कायरन पोलार्ड यंदा आयपीएलच्या मैदानावर नसेल, पण…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2023 05:17 PM IST

Kieron pollard in IPL 2023 : आपल्या निर्दयी फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा स्फोटक अष्टपैलू कायरन पोलार्ड यंदाच्या आयपीएलमध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Kieron pollard
Kieron pollard (AFP)

Kieron pollard in IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचा नवा सीझन लवकरच सुरू होत आहे. त्या निमित्तानं संभाव्य विजेत्या संघावर पैजा लावल्या जात असून खेळाडूंच्या कामगिरीची व विक्रमांचीही चर्चा होत आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा मैदानात नसूनही त्याची जोरदार चर्चा आहे. कारण, आगामी आयपीएलमध्ये तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

कायरन पोलार्ड हा त्याच्या स्फोटक आणि निर्दयी फलंदाजीसाठी ओळखला जातो. पोलार्डनं मागील वर्षी आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएल खेळत असताना तो मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ होता. पोलार्डनं मुंबईसाठी १८९ सामन्यात ३४१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं ६९ विकेट्सही घेतल्या आहेत.

पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचा पूर्णवेळ फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. नुकताच त्यानं पहिल्या सराव शिबिरात भाग घेतला. पोलार्डमध्ये उत्तम नेतृत्व गुण आहेत. तरुण खेळाडू त्याचा सल्ला घेत असतात व त्याच्याकडून काही ना काही शिकत असतात. त्याच्या अनुभवाचा मुंबई इंडियन्समधील युवा खेळाडूंना फायदा होणार आहे.

‘मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याचा अनुभव शब्दांत वर्णन करता येणार नाही. व्यक्तिगत पातळीवर या संघानं मला बरंच काही दिलंय आणि एक खेळाडू म्हणून मी संघासाठी शक्य ते सर्व देण्याचा प्रयत्न केलाय. आमच्यामधील नातं क्रिकेटच्याही पलीकडचं आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. भूमिका बदलली तरी माझा स्वभाव पूर्वीसारखाच असेल,’ असं त्यानं म्हटलं आहे.

WhatsApp channel

विभाग