मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Auction: ठरलं! वर्ल्डकपनंतर ‘या’ दिवशी होणार IPL ऑक्शन, जाणून घ्या

IPL 2023 Auction: ठरलं! वर्ल्डकपनंतर ‘या’ दिवशी होणार IPL ऑक्शन, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 23, 2022 04:38 PM IST

BCCI on IPL 2023 Auction: इंडियन प्रीमियर लीग-२०२३ ची तयारी सुरू झाली आहे. एका रिपोर्टनुसार, डिसेंबर महिन्यात IPL ऑक्शन होऊ शकते. यावेळी आयपीएल आपल्या जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

IPL 2023
IPL 2023

टीम इंडिया सध्या टी-२० विश्वचषकाची तयारी करत असून पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, डिसेंबरमध्ये इंडियन प्रीमियर लीग-२०२३ साठी लिलाव होऊ शकतो. हा एक मिनी लिलाव असेल, ज्याचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही.

Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, BCCI डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा लिलाव आयोजित करू शकते. असे मानले जात आहे की १६ डिसेंबर रोजी आयपीएल २०२३ साठी हे ऑक्शन होऊ शकते. आयपीएल २०२२ पूर्वी एक मेगा लिलाव झाला होता, परंतु हा एक मिनी लिलाव असेल.

लिलावासाठी प्रत्येक संघाची पर्स ९५ कोटी रुपये असेल, जर एखादा खेळाडू बाहेर पडला तर त्यानुसार संघाच्या पर्समधील रक्कम वाढेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संघांच्या पर्समध्ये ५ कोटी रुपये जास्त आहेत.

रविंद्र जडेजावर सर्वाधिक लक्ष असणार

आयपीएल २०२२ नंतर अनेक संघांमध्ये खेळाडूंची खराब कामगिरीची आणि अंतर्गत वाद यांची चर्चा सुरु होती. अशा परिस्थितीत या मिनी ऑक्शनमध्ये अनेक मोठे व्यवहार पाहायला मिळू शकतात. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र जडेजा, गुजरात टायटन्सचा शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात येऊ शकते.

आयपीएल २०२३ अनेक अर्थाने खास असणार

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आधीच घोषणा केली आहे की, आयपीएल २०२३ जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. म्हणजेच यावेळची आयपीएल भारतात होणार असून होम आणि अवेप्रमाणे सामने होणार आहेत. म्हणजेच, प्रत्येक संघांच्या होम ग्राऊंडवरही सामने आयोजित केले जातील.

दरम्यान हे आयपीएल अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरु शकते. याशिवाय महिला आयपीएलही २०२३ पासून सुरू होऊ शकते, त्यामुळे बीसीसीआय या सर्व मोठ्या स्पर्धांच्या तयारीत व्यस्त आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या