International Olympics Day : भारताचे 'ऑलिम्पिक'वीर, या खेळाडूंनी जगभरात उंचावली भारताची मान
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  International Olympics Day : भारताचे 'ऑलिम्पिक'वीर, या खेळाडूंनी जगभरात उंचावली भारताची मान

International Olympics Day : भारताचे 'ऑलिम्पिक'वीर, या खेळाडूंनी जगभरात उंचावली भारताची मान

Jun 23, 2024 06:57 PM IST

International Olympics Day 2024 : ऑलिम्पिक खेळ खूप खास आहेत, कारण हे ऑलिम्पिक गेम्स ४ वर्षातून एकदा येतात आणि जवळजवळ सर्व देशांचे मोठे खेळाडू त्यात सहभागी होतात. या खास प्रसंगी आपण भारताच्या खास ऑलिम्पिक वीरांबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी जगभरात भारताची मान उंचावली आहे.

भारताचे 'ऑलिम्पिक'वीर, या खेळाडूंनी जगभरात उंचावली भारताची मान
भारताचे 'ऑलिम्पिक'वीर, या खेळाडूंनी जगभरात उंचावली भारताची मान

आज रविवारी (२३ जून) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे. जगभरात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ऑलिम्पिक खेळ खूप खास आहेत, कारण हे ऑलिम्पिक गेम्स ४ वर्षातून एकदा येतात आणि जवळजवळ सर्व देशांचे मोठे खेळाडू त्यात सहभागी होतात. 

या खास प्रसंगी आपण भारताच्या खास ऑलिम्पिक वीरांबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी जगभरात भारताची मान उंचावली आहे.

अभिनव बिंद्रा

भारताचा महान नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे, वैयक्तिक गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा पहिला भारतीय खेळाडू आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी बिंद्राला हे यश मिळाले. लहानपणी त्याला बंदुकीसोबत खेळण्यात खूप मजा यायची. टीव्हीवर नेमबाजी बघून तो खूप प्रेरित व्हायचा. यासाठी त्याने शूटिंगची निवड केली.

अभिनव बिंद्राने १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तो राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेणारा सर्वात युवा नेमबाज होता. यानंतर २००८ मध्ये अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिकमधील वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

नीरज चोप्रा

नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या लाखो तरुणांना तो प्रेरणा देतो. त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या पदकामुळे तो देशवासियांचा हिरो तर झालाच शिवाय त्याने भारतातील ॲथलेटिक्सलाही नवी ओळख मिळवून दिली. नीरजसाठी लहानपणापासून खेळ ही त्याची पहिली पसंती होती.

२०११ मध्ये त्याने भालाफेकीवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. २०१६ मध्ये, पोलंडमध्ये झालेल्या IAAF वर्ल्ड U-20 चॅम्पियनशिपमध्ये त्याने ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करून जागतिक विक्रम केला आणि सुवर्णपदक जिंकले. 

यानंतर २०२३ च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

त्याआधी नीरज हा ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय आहे, त्याने २०२१ मध्ये ही कामगिरी केली.

खाशाबा जाधव

दरम्यान, देशाला सर्वात पहिले ऑलिम्पिक पदक एका मराठमोळ्या व्यक्तीने मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी स्पर्धेत घडविला. २३ जूलैच्या दिवशी त्यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले. 

त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकासाठी देशाला तब्बल ४४ वर्षे वाट पाहावी लागली. त्यावरून खाशाबांनी २३ जुलै १९५२ साली मिळविलेल्या कांस्यपदकाचे महत्त्व खर्‍या अर्थाने अधोरेखित होते.

फिनलॅण्ड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत फ्री स्टाइल बँटमवेट कुस्ती गटात खाशाबांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चीतपट करून कांस्यपदक पटकविण्याची किमया केली. 

Whats_app_banner