भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना बगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रविवारी होणारा हा सामना जो जिंकेल तो मालिकेचा विजेता ठरणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला होता. तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने शानदार खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही सामने आपल्या नावे केले. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्यादरम्यान जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचं रेकॉर्ड खराब-
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने एकूण ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाला तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. या मैदानावर २०१२ मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा ५ गडी राखून पराभव केला होता. यानंतर २०१६ मध्ये बांगलादेश आणि २०१७ मध्ये इंग्लंडला टीम इंडियाने या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले होते, मात्र, या मैदानावरील गेल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
चिन्नास्वामी मैदानावर भारताचा दक्षिण आफ्रिकेशी फक्त एकदाच सामना झाला आहे. मागच्या दौऱ्यात आफ्रिकेने भारतीय संघाचा ९ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली होती.
बंगळुरुत सायंकाळी जोरदार पावसाचा अंदाज-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान पाऊस येण्याची ७६ ट्क्के इतकी शक्यता आहे.
दोन्ही देशांचे संभाव्य संघ-
भारत:
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, हेनरिक क्लासेन, रुसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.