मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsSA: पाचवा आणि निर्णायक सामना 'पाण्यात', मालिका २-२ अशी बरोबरीत

INDvsSA: पाचवा आणि निर्णायक सामना 'पाण्यात', मालिका २-२ अशी बरोबरीत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 19, 2022 10:32 PM IST

दक्षिण आफ्रिकेने २०१० पासून भारतीय भूमीवर मर्यादित षटकांची मालिका गमावली नाही. त्यांनी यावेळेसही हा विक्रम कायम ठेवला आहे.

INDvsSA
INDvsSA

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार होता. यानंत आता टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली आहे. या मालिकेतील दक्षिण पहिले दोन सामने आफ्रिकेने जिंकले होते. यानंतर भारताने मालिकेत शानदार प्रदर्शन करत तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० मध्ये विजय मिळवला.

आजच्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला. पहिल्यांदा नाणेफेकीनंतर पावसामुळे सामना ५० मिनिटे थांबवण्यात आला. सायंकाळी ७ वाजता सामना सुरू होण्याऐवजी ७.५० वाजता सामना सुरू झाला. त्यानंतर दोन्ही डावांतून प्रत्येकी एक षटक कापण्यात आले आणि सामना १९ षटकांचा करण्यात आला होता. मात्र, भारतीय डावाच्या ३.३ षटकांनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि त्यानंतरही पाऊस थांबला नाही. पुन्हा पाऊस सुरू झाला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या दोन बाद २८ धावा होती.

पाचव्या टी-२० साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नव्हता, त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाच सामन्यांची T20I मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

दक्षिण आफ्रिकेने २०१० पासून भारतीय भूमीवर मर्यादित षटकांची मालिका गमावली नाही. त्यांनी यावेळेसही हा विक्रम कायम ठेवला आहे. तसेच, रिषभ पंतही कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकू शकला नाही.

आता भारतीय टी-२० संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंडला जाणार आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक संघ हा इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर दुसरा संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि तेवढ्चाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.

WhatsApp channel