मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsIRE: रोहित-राहुलचा विक्रम मोडला, संजू-हुड्डाकडून आयरिश गोलंदाजांची धुलाई

INDvsIRE: रोहित-राहुलचा विक्रम मोडला, संजू-हुड्डाकडून आयरिश गोलंदाजांची धुलाई

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 28, 2022 11:50 PM IST

संजू-हुड्डाच्या या भागीदारीनंतर आता सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने सामन्यात दमदार शतकी खेळी साकारली. त्याने ५७ चेंडूत १०४ धावा ठोकल्या.

sanju and hooda
sanju and hooda

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना डब्लिन येथे सुरु आहे.  या शेवटच्या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर २२८ धावांचे आव्हान ठेवले आहे. दीपक हुडाचे शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ७ बाद २२७ धावा केल्या आहेत. हुड्डाने १०४ तर संजूने ७७ धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १७६ धावांची भागिदारी रचली. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

या पूर्वी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा  रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीच्या नावावर होता. दोघांनी २०१७ मध्ये श्रीलंकेविरूद्ध पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची भागिदारी केली होती. या भागीदारीचा रेकॉर्ड आता मोडला आहे. या शिवाय रोहित शर्मा - शिखर धवनने २०१८ मध्ये आयर्लंडविरूद्ध पहिल्या विकेटसाठी १६० धावांनी भागीदारी रचली होती. तसेच, रोहित शर्मा आणि शिखर धवननेच २०१७ ला न्यूझीलंड विरूद्ध १५८ धावांची सलामी दिली होती.

संजू-हुड्डाच्या या भागीदारीनंतर आता सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.  तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने सामन्यात दमदार शतकी खेळी साकारली. त्याने ५७ चेंडूत १०४ धावा ठोकल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले शतक ठरले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दीपक हुड्डा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. हुड्डाशिवाय सलामीवीर संजू सॅमसननेही आज शानदार फटकेबाजी केली. त्याने ४२ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली.

दरम्यान, सामन्यात हुड्डा आणि संजू या दोघांशिवाय टीम इंडियाचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. भारताचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे. आयर्लंडकडून मार्क अडायरने ३ बळी घेतले. तर जोशुआ लिटल आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

WhatsApp channel