भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.
विनेशने आता किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. विनेशची फायनल बुधवारी (७ ऑगस्ट) होणार आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू आहे.
तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या फेरीपर्यंत विनेश १-० ने आघाडीवर होती. त्यानंतर शेवटच्या ३ मिनिटांत तिने क्युबाच्या कुस्तीपटूवर दुहेरी आक्रमण करत ४ गुणांची कमाई केली. ही आघाडी तिने शेवटपर्यंत कायम राखली आणि अंतिम फेरीत धडक मारली.
या ऑलिम्पिकमधील विनेशचा प्रवास विलक्षण राहिला आहे. दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेतल्यानंतर आणि त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये राऊंड ऑफ १६ मधून बाहेर पडल्यानंतर विनेशने यावर्षी आपली प्रतिभा जगाला दाखवली आहे.
तिच्या पहिल्या सामन्यातच म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीत, विनेशने ४ वेळा विश्वविजेती आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सुसाकीचा ३-२ असा पराभव केला.
त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ओक्सानाचा ७-५ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत ५-० असा विजय मिळवत विनेशने अंतिम फेरीत धडक मारली.
विनेशने किमान रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे आणि ती बुधवारी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी सुवर्णपदकासाठी खेळले.
विनेशपूर्वी ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन पुरुष कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार आणि २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु दोघांनाही शेवटचा सामना गमवावा लागला होता.
विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू बनण्याची सुवर्णसंधी आहे. उपांत्य फेरीत तिने क्युबाची प्रतिस्पर्धी कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझचा एकतर्फी ५-0 असा पराभव केला. विनेश प्रथमच ऑलिम्पिकमध्ये ५० किलो गटात खेळत आहे. यापूर्वी ती ५३ किलो गटात खेळायची. विनेशने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत.
यामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिपमधील ८ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही.
२९ वर्षांची विनेश फोगटने गेल्या वर्षी मॅटपासून दूर बराच वेळ घालवला. विनेश फोगाट आणि आणि भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यात बराच काळ वाद चालला.