वडील कॉफीची शेती करा तर आई गृहिणी. घरचं वातावरण अगदीच साधे होते. पण या छोट्याशा कुटुंबातील एका मुलाच्या डोळ्यात एक भलंमोठं स्वप्न होतं, त्याला काहीतरी मोठं करायचं होतं. मग वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला टेनिस खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.
वडिलांना पूर्ण विश्वास होता की आपला मुलगा एक दिवस कुटुंबाला वैभव मिळवून देईल आणि त्या मुलानेही वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कारकिर्दीत अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले, पण तो मागे हटला नाही. त्या मुलाचं नाव आहे रोहन बोपण्णा.
रोहन बोपण्णा हा केवळ एक टेनिसपटूच नाही तर लाखो तरुणांसाठी तो प्रेरणास्थान आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिल्या फेरीतूनच बाहेर पडल्यानंतर बोपण्णाने आपली टेनिस कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, रोहन बोपण्णा कधी जिंकला तर कधी हरला. मात्र त्याने आयुष्यात कधीही हार मानली नाही. देशाचे नाव जागतिक स्तरावर गौरविण्यासाठी सतत मेहनत घेतली.
रोहनचा जन्म मार्च १९८० मध्ये कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच टेनिसची आवड होती. आपला खेळ सुधारण्यासाठी तो युनायटेड स्टेट्सला गेला, जिथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि टेनिसच्या जगात आपला ठसा उमटवला.
टेनिस इतिहासात ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा विक्रमही बोपण्णाच्या नावावर आहे. रोहण बोपण्णा याने वयाच्या ४४ व्या वर्षी ग्रॅंण्डस्लॅम जिंकले होते.
रोहन बोपण्णा विशेषतः दुहेरी टेनिसमधील चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. बोपण्णाने गॅब्रिएला डॅब्रोव्स्की हिच्यासोबत २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटाकवले होते. यासह त्याने अनेक ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. बोपण्णाला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
बोपण्णा हा २००२ मध्ये भारतीय डेव्हिस कप संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. याशिवाय रोहनने सानिया मिर्झासह २००६ मध्ये आशियाई हॉपमन चषक जिंकला होता.
रोहन बोपण्णाने दोन ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत आणि त्याच्या कारकिर्दीत ६ एटीपी मास्टर्स १००० विजेतेपदंही जिंकली आहेत. या अनुभवी टेनिसपटूने २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
ग्रँड स्लॅम विजेता असण्यासोबतच रोहन बोपण्णा देशात टेनिसला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतो. तरुण खेळाडूंना वाव देण्यासाठीही तो तयार असतो. त्याने टेनिस अकादमीही स्थापन केली आहे. जिथे युवा खेळाडूंना टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडू होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.