OIympic Games Medal : आतापर्यंत ‘या’ नेमबाजांनी जिंकली आहेत भारतासाठी ऑलिम्पिक पदके!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  OIympic Games Medal : आतापर्यंत ‘या’ नेमबाजांनी जिंकली आहेत भारतासाठी ऑलिम्पिक पदके!

OIympic Games Medal : आतापर्यंत ‘या’ नेमबाजांनी जिंकली आहेत भारतासाठी ऑलिम्पिक पदके!

Jul 28, 2024 09:00 PM IST

Olympics medals : चार पुरुष आणि एक महिला अशा पाच भारतीय नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकांची कमाई केली असून मनू भाकर ही पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे, जिने पदक जिंकले आहे.

मनु भाकरने १२ वर्षानंतर नेमबाजीत पदक जिंकले. (REUTERS)
मनु भाकरने १२ वर्षानंतर नेमबाजीत पदक जिंकले. (REUTERS)

भारताची स्टार महिला नेमबाज मनू भाकरने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत ब्राँझपदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले. भाकरचे हे पदक ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आले असून येत्या काही आठवड्यांत आणखी पदके भारताच्या झोळीत पडण्याची आशा आहे. 

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या पाच भारतीय नेमबाजांची यादी पुढीलप्रमाणे :

राज्यवर्धन सिंह राठोड - अथेन्स २००४

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी २० वर्षांपूर्वी अथेन्स येथे इतिहास रचला आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला. राठोडने पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. अजूनही हे भारताचे एकमेव शॉटगन पदक आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद अल मकतूमने सुवर्ण, तर चीनच्या वांग झेंगने ब्राँझपदक पटकावले होते.

अभिनव बिंद्रा - बीजिंग २००८

अभिनव बिंद्रा वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय आहे. चीनच्या राजधानीत रेकॉर्ड बुकमध्ये त्याने आपले नाव कोरले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये त्याने जेतेपद पटकावले, जे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारताचे पहिले रायफल पदक आहे. चीनच्या झू किनान आणि फिनलंडच्या हेन्री हकिनेन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. बिंद्राच्या सुवर्णपदकामुळे भारताच्या पदकांची संख्या तीन वर पोहोचली - एकाच ऑलिम्पिकमधून दोनपेक्षा जास्त पदके जिंकण्याची भारतीय खेळाडूंची ही पहिलीच वेळ होती.

२००८ मध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते. (Getty Images)
२००८ मध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते. (Getty Images)

विजय कुमार - लंडन २०१२

विजय कुमारने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल फायनलमध्ये रौप्यपदक जिंकले, जे पिस्तूल नेमबाजीतील भारताचे पहिले पदक आहे. क्युबाच्या ल्युरिस पुपोने सुवर्ण, तर चीनच्या डिंग फेंगने ब्राँझपदक पटकावले होते.

विजय कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले.
विजय कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले.

गगन नारंग – लंडन २०१२

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत गगन नारंगने ब्राँझपदक पटकावल्यामुळे भारताच्या खात्यात सहा पदकांची नोंद झाली आहे. इटलीचे दिग्गज निकोलो कॅम्परियानी आणि रोमानियाचे एलिन मोल्दोवेनू यांनी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले होते. रिओ २०१६ आणि टोकियो २०२१ मध्ये भारताला नेमबाजी पदक जिंकता आले नाही.

गगन नारंग. (Getty Images)
गगन नारंग. (Getty Images)

मनू भाकर – पॅरिस २०२४

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल च्या अंतिम फेरीत ब्राँझपदक जिंकून मनू भाकरने नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. या पदकामुळे २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडले असून दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि किम येजी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले आहे. भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आणि विजयनंतरची दुसरी पिस्तूल नेमबाज ठरली.

Whats_app_banner
विभाग