पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅराथलीट्सने इतिहास रचला आहे. भारतीय खेळाडूंनी अवघ्या ६ दिवसांत अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कधीही घडली नव्हती.
खरंतर, पॅरिसमध्ये भारताने २० पदकांचा टप्पा गाठून पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास रचला आहे. भारताच्या खात्यात आता एकूण २० पदके जमा झाली आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.
पॅरिसपूर्वी भारताने टोकियो २०२० मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती. पण, आता पॅरिसमध्ये पहिल्या ६ दिवसातच भारतीय पॅराथलीट्सनी पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ४ खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक १० पदके ॲथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये ५ तर नेमबाजीत ४ पदके आली आहेत. तिरंदाजीतून एक पदक मिळाले आहे. भारताने ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच सहाव्या दिवशी ५ पदके जिंकली. दीप्ती जीवनजी, शरद कुमार, मरियप्पन थांगावेलू, अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांनी ही पदके जिंकली.
भारत १९६८ पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खातेही उघडले नव्हते. यानंतर १९७२ मध्ये भारताला पहिले पदक सुवर्णाच्या रूपाने मिळाले. भारताने पुढच्या २ पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही पण १९८४ मध्ये भारतीय पॅराथलीट ४ पदके जिंकण्यात यशस्वी झाले.
यानंतर पुन्हा एकदा भारताला पुढील ४ पॅरालिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यानंतर २००४ च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताला २ पदके जिंकण्यात यश आले.
यानंतर, २००८ बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला कोणतेही पदक मिळाले नाही आणि २०१२ लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ १ पदकावर समाधान मानावे लागले.
२०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने ४ पदके जिंकली होती पण त्याची सर्वोत्तम कामगिरी अजून व्हायची होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकून नवा विक्रम रचला आणि आता पॅरिसमध्ये भारताने टोकियोमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.