चक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी ‘या’ संघाला भिडणार-indian hockey team won the semifinal match of asian champions trophy 2024 beat south korea enter in final ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  चक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी ‘या’ संघाला भिडणार

चक दे इंडिया! कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, जेतेपदासाठी ‘या’ संघाला भिडणार

Sep 16, 2024 05:45 PM IST

India vs South Korea Hockey : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला.

दक्षिण कोरियाला धुळ चारत टीम इंडिया फायनलमध्ये, जेतेपदासाठी या संघाला भिडणार
दक्षिण कोरियाला धुळ चारत टीम इंडिया फायनलमध्ये, जेतेपदासाठी या संघाला भिडणार

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज (१६सप्टेंबर) धमाकेदार खेळ करत कोरियन संघाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला होता.

भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमध्येच आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. याचा फायदा घेत पहिल्या क्वार्टरमध्ये उत्तम सिंगने उत्कृष्ट गोल केला आणि सामन्यात भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले

भारताने गोल करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि १९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात त्याचे फळ मिळाले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी दुसरा गोल केला. यानंतर कोरियन संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

जर्मनप्रीत सिंगने दमदार गोल केला

हाफ टाइमपर्यंत टीम इंडियाकडे २-० अशी आघाडी होती. यानंतर जर्मनप्रीत सिंगने तिसरा गोल केला. त्याने कोरियन गोलकीपर किमला अजिबात हालचाल करण्यास वेळ दिला नाही. भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड प्रस्थापित केली होती. त्यानंतर कोरियाच्या यांग जी-हुनने उत्कृष्ट गोल नोंदवून आपल्या संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात कोरियासाठी गोल करणारा तो एकमेव खेळाडू होता.

भारत सहाव्यांदा फायनलमध्ये

टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने चौथा गोल केला. त्याचा हा सामन्यातील एकूण दुसरा गोल ठरला. त्याने भारताला ४-१ ने पुढे केले. ही गोलसंख्या सामना संपेपर्यंत कायम राहिली. 

या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. भारताने सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारताचा सामना चीनशी होणार आहे. चीनने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Whats_app_banner