India vs Pakistan Hockey Match Highlights : भारतीय हॉकी संघाने आज (१४ सप्टेंबर) पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी धमाकेदार कामगिरी केली आणि दोन्ही गोल केले.
हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना खेळला गेला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. आता टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पाकिस्तानच्या अहमद नदीमने पहिल्या क्वार्टरच्या ८व्या मिनिटाला केला. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाने नंतर अतिशय वाईट खेळ केला आणि संघ केवळ एका गोलपुरता मर्यादित राहिला.
सामन्यात पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने १३व्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला बरोबरी साधून दिली. हा गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाला. अशाप्रकारे पहिल्या १५ मिनिटांच्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ १-१ असे बरोबरीत राहिले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने १९व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल केला. कर्णधाराने दुसरा गोलही पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. आता भारताने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली होती. भारताची ही आघाडी विजयासाठी पुरेशी होती. टीम इंडिया २-१ ने जिंकली.
विशेष म्हणजे, भारतीय संघाने सलग ५ सामने जिंकून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात चीन, दुसऱ्या सामन्यात जपान, तिसऱ्या सामन्यात मलेशिया, चौथ्या सामन्यात कोरिया आणि पाचव्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आता टीम इंडिया सोमवारी उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे.