मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारताच्या प्रज्ञानानंदने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला केलं 'चेमकेट'

भारताच्या प्रज्ञानानंदने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला केलं 'चेमकेट'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 12:05 PM IST

वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा फायदा घेत प्रज्ञानानंदने विजय मिळवला. त्यानंतर प्रज्ञानानंद म्हणाला की, "मला अशा पद्धतीने जिंकायचं नाहीय."

आर प्रज्ञानानंद
आर प्रज्ञानानंद (फोटो - एएनआय)

भारताचा १६ वर्षांचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याने सलग दुसऱ्यांदा मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं आहे. त्याने चेसेबल मास्टर्समध्ये मॅग्नस कार्लसनपेक्षा सरस कामगिरी करत विजय मिळवला. वर्षाच्या सुरुवातीला प्रज्ञानानंदने कार्लसनला हरवलं होतं. त्यानंतर तीन महिन्यात पुन्हा एकदा त्यानं कार्लसनपेक्षा चांगली कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

चेसेबल मास्टर्स ही एक १६ खेळाडूंची ऑनलाइन रॅपिड चेस स्पर्धा आहे. यामध्ये कार्लसन आणि प्रज्ञानानंद यांच्यातील सामना अनिर्णित स्थितीत होता. मात्र कार्लसनकडून ४० वी चाल खेळताना मोठी चूक झाली. या चुकीचा फायदा प्रज्ञानानंदने उचलला आणि कार्लसनविरोधात विजय मिळवला.

वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनविरोधात विजय मिळवल्यानंतर प्रज्ञानानंदने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चासुद्धा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याच्या खेळासह प्रतिक्रियेचं कौतुकही होत आहे. कार्लसनच्या चुकीचा फायदा घेत प्रज्ञानानंद विजयी झाला. मात्र अशा पद्धतीने मला जिंकायचं नाहीय असं प्रज्ञानानंदने म्हटलं आहे.

चेसेबल मास्टर्स स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कार्लसन १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे तर प्रज्ञानानंद १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. चीनच्या वेई यी १८ गुणांसह अव्वल स्तानावर असून दुसऱ्या स्थानी असलेल्या डेव्हिड अँटोनचे १५ गुण आहेत.

याआधी एयरथिंग्स मास्टरच्या ८ व्या फेरीत प्रज्ञानानंदाने कार्लसनला हरवलं होतं. या स्पर्धेत तो सर्वात लहान बुद्धीबळपटू होता. कार्लसनने तेव्हाही प्रज्ञानानंदासमोर अनेक चुका केल्या होत्या. शेवटी त्याला पराभवाचा धक्का बसला होता. त्याआधी कार्लसन आणि प्रज्ञानानंदा यांच्यात झालेल्या तीनही सामन्यात कार्लसनने विजय मिळवला होता. आतापर्यंत दोघांमध्ये सहा वेळा सामना झाला असून यात चार वेळा कार्लसन तर दोन वेळा प्रज्ञानानंद विजयी झाला आहे.

WhatsApp channel