भारतीय गोल्फर दीक्षा डागर हिचा भीषण अपघात झाला आहे. पॅरिसमध्ये ती एका कार अपघाताची बळी ठरल्याचे बोलले जात आहे. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत, मात्र तिची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात दिक्षाच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिक्षा डागर ७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला पोहोचली होती. सध्याच्या अपडेटनुसार, दीक्षाची प्रकृती स्थिर आहे, मात्र तिची आई गंभीर जखमी झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिक्षाचा अपघात ३० जुलै रोजी संध्याकाळी झाला. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील ४ जण कारमध्ये प्रवास करत होते.
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील २३ वर्षीय दीक्षाने २०१९ मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली. जागतिक क्रमवारीच्या आधारे तिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कोटा पद्धतीने थेट प्रवेश मिळाला होता. दिक्षा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने संयुक्तपणे ५० वे स्थान मिळविले होते.
दिक्षा डागर ही ऑलिम्पिकच्या इतिहासातील काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना ऐकायला त्रास होतो. खरे तर तिला जन्मापासूनच ऐकण्याची समस्या आहे आणि तिने 'डेफलिम्पिक'मध्येही भाग घेतला आहे. २०१७ च्या डेफलिम्पिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे तिने रौप्य पदक जिंकले. तिच्या यशाबद्दल सांगायचे तर, अदिती अशोक नंतर लेडीज युरोपियन टूर जिंकणारी ती दुसरी भारतीय गोल्फर आहे.
दीक्षा डागर हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकले नाही. पण तरी तिच्या नावार एक ऐतिहासिक कामगिरी आहे. तिने २०१७ मध्ये 'डेफलिम्पिक'मध्ये भाग घेतला होता, तर २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन, डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती जगातील पहिली ॲथलीट बनली. तिच्या व्यतिरिक्त अदिती अशोक देखील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
संबंधित बातम्या