भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंमध्ये सायना नेहवाल हिची गणना केली जाते. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी दोन पदकेही जिंकली आहेत.
सायना नेहवालने नुकताच खुलासा केला आहे, की ती संधिवाताशी झुंज देत आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तिला खेळातील भविष्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल कारण या आजारामुळे तिला सराव करणे कठीण झाले आहे.
अनुभवी नेमबाज गगन नारंग याच्या 'हाऊस ऑफ ग्लोरी' या पॉडकास्टमध्ये सायना नेहवाल म्हणाली, की माझ्या गुडघ्याची स्थिती ठीक नाही. मला संधिवात आहे. माझे कार्टिलेज खराब झाले आहे. अशा स्थितीत ८-९ तास खेळाशी जोडलेले राहणे फार कठीण आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंना आव्हान कसे देणार. मला हे काही पातळीवर स्वीकारावे लागेल कारण दोन तासांचा सराव अव्वल खेळाडूंविरुद्ध निकाल मिळविण्यासाठी पुरेसा नाही.
सायना नेहवाल म्हणाली की ती अजूनही निवृत्तीचा तिच्यावर कसा परिणाम करेल यावर विचार करत आहे, परंतु शेवटी तिला निर्णय घ्यावा लागेल हे मान्य केले. सायना भारतीय जनता पक्षाची सदस्याही आहे. तिने खेळलेली शेवटची स्पर्धा एक वर्षापूर्वी सिंगापूर ओपनमध्ये होती, यात तिला सुरुवातीच्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
सायना नेहवाल म्हणाली की, मी निवृत्तीचा विचार करत आहे. हे वेदनादायक आहे. साहजिकच खेळाडूची कारकीर्द नेहमीच लहान असते. मी वयाच्या नवव्या वर्षी सुरुवात केली. पुढच्या वर्षी मी ३५ वर्षांची होईन. माझी कारकीर्दही मोठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी जे काही साध्य केले त्यात मी आनंदी आहे. वर्षाच्या अखेरीस मी निर्णय घेईन".
ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे प्रत्येकाचे लहानपणापासूनचे स्वप्न असते, असे या स्टार भारतीय बॅडमिंटनपटूने सांगितले. ती पातळी गाठण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तयारी करता. म्हणून, जेव्हा आपण हे साध्य करू शकणार नाही हे लक्षात येते तेव्हा कधीकधी खूप वाईट वाटते. मी अत्यंत मेहनत घेतली आहे. मी तीन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्या सर्वांमध्ये मी माझे १०० टक्के दिले. मला त्याचा अभिमान आणि आनंदही आहे".