Hockey India Prize Money : हॉकीपटूंवर पैशांचा वर्षाव, ९ वर्षानंतर भारताला हॉकीत सुवर्णपदक, किती रक्कम मिळणार? पाहा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hockey India Prize Money : हॉकीपटूंवर पैशांचा वर्षाव, ९ वर्षानंतर भारताला हॉकीत सुवर्णपदक, किती रक्कम मिळणार? पाहा

Hockey India Prize Money : हॉकीपटूंवर पैशांचा वर्षाव, ९ वर्षानंतर भारताला हॉकीत सुवर्णपदक, किती रक्कम मिळणार? पाहा

Published Oct 06, 2023 10:50 PM IST

india won gold in hockey : भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल ९ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या कामगिरीबद्दल हॉकी इंडियाने संघातील सर्व खेळाडूंना विशेष बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.

Hockey India
Hockey India (AFP)

Indian Hockey Team asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत सातत्याने इतिहास रचत आहे. भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. ७२ वर्षांनंतर भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत १०० पदके जिंकण्याच्या मार्गावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १३व्या दिवशी भारतीय पुरुष हॉकी संघानेही सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. 

एशियन गेम्सच्या हॉकी स्पर्धेत भारताने सुवर्णपदकाच्या सामन्यात जपानचा पराभव केला. या सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडियाने ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

खेळाडूंव्यतिरिक्त, हॉकी इंडियाने हॉकी संघाच्या प्रत्येक सपोर्ट स्टाफसाठी २.५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी २०१८ च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथे हॉकी सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघ २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

भारताने जपानचा ५-१ असा पराभव केला

सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, मनप्रीत सिंग, अमित रोहिदास आणि अभिषेक यांनी गोल केले. दुसरीकडे, जपानसाठी एकमेव गोल सेरेन तनाकाने केला. अशाप्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम हॉकी सामन्यात भारताने जपानचा ५-१ अशा मोठ्या फरकाने आणि एकतर्फी पराभव केला.

भारताच्या या मोठ्या विजयावर बोलताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष 'पद्मश्री' दिलीप तिर्की म्हणाले, "आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारताला ९ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. जागतिक हॉकीमध्ये देशाची ही आणखी एक सुवर्ण कामगिरी आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे. संघाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांमुळे हे यश मिळाले. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या दिशेने आमच्या प्रवासाची ही सुरुवात आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचा संघ येत्या वर्षभरात आणखी प्रगती करत राहील. या संस्मरणीय विजयासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि प्रशिक्षकाचे अभिनंदन."

Whats_app_banner

संबंधित बातम्या