भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने २ गोल करत भारताला स्पेनविरुद्ध आघाडी मिळवून दिली जी अखेरीस निर्णायक ठरली.
टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते आणि आता सलग दुसऱ्यांदा पोडियमवर स्थान मिळवण्यात संघाला यश आले आहे.
भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला यादगार निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. अशा प्रकारे भारताने ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत १३ वे पदक जिंकले.
तत्पूर्वी कांस्यपदकाच्या या सामन्यात भारताचे दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगने केले. टीम इंडियाचा दिग्गज गोलकीपर पी. श्रीजेशसाठी हा सामना खूप खास होता. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे हे चौथे पदक आहे. याआधी भारताने नेमबाजीत ३ पदके जिंकली आहेत.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसले. मात्र या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने बाजी मारली. त्यांच्याकडून मार्क मिरालेसने १८व्या मिनिटाला गोल केला.
मात्र, स्पेनचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपली ताकद दाखवत भारतासाठी पहिला गोल केला. अशाप्रकारे भारत आणि स्पेनचे संघ दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटपर्यंत १-१ बरोबरीत होते.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडिया खूपच आक्रमक दिसली. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने एक गोल केला. हरमनप्रीतने ३३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला. यानंतर लगेचच ३५व्या मिनिटाला अभिषेकला ग्रीन कार्ड दाखवण्यात आला. मात्र, तोही ३७व्या मिनिटाला मैदानात आला. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस टीम इंडियाकडे २-१ अशी आघाडी होती.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला होता. पुढचा सामना अर्जेंटिनाबरोबर अनिर्णित राहिला. तिसऱ्या सामन्यात भारताने आयर्लंडचा २-० असा धुव्वा उडवला.
पण बेल्जियमविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला. भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला होता. भारताने यावेळी ग्रेड ब्रिटनचाही पराभव केला. पण भारताला सेमी फायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.