india won 100 medla in asian games 2023 : चीनच्या हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. आज (६ ऑक्टोबर) १३वा दिवस भारतासाठी खूप चांगला होता. आज भारताने एकूण ९ पदके जिंकली, ज्यात एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे. हॉकी संघाने अंतिम फेरीत जपानचा ५-१ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. यानंतर भारताच्या पदकांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. एशियन गेम्समधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे भारताची पदकांची संख्या १०० च्या पुढे जाणार हे आता निश्चित झाले आहे.
आज शुक्रवारी भारताने कुस्तीत ३ कांस्यपदके पटकावली. तर तिरंदाजीत १ रौप्य, आणि एक कांस्यपदक जिंकले. यानंतर ब्रिजमध्ये एक रौप्य, बॅडमिंटनमध्ये एक कांस्य, याशिवाय सेपटेकरावमध्ये मिळालेले पदक ऐतिहासिक आहे. हॉकीतील सुवर्णपदक हा सर्वात मोठा आनंद आहे कारण त्यासोबतच भारतीय हॉकी संघाचे पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित झाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (७ ऑक्टोबर) आणखी ७ पदके येणार असून पदकांची संख्या शंभरी ओलांडणार आहे. कंपाऊंड तिरंदाजी (३), कबड्डी (२), बॅडमिंटन (१) आणि पुरुष क्रिकेट (१) मध्ये भारताला पदके मिळणे निश्चित आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने २० हून अधिक सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी ७२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९५१ च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके मिळाली होती. त्यावेळी भारताने १५ सुवर्णपदके जिंकली होती. तर जकार्ता येथे झालेल्या गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती. हा आकडा भारताने आधीच मागे टाकला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. तर, यजमान चीन ३४५ पदकांसह अव्वल स्थानावर आहे.
संबंधित बातम्या