मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind-W vs Eng-W 2nd ODI: भारतीय महिला संघानं इतिहास रचला, २३ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

Ind-W vs Eng-W 2nd ODI: भारतीय महिला संघानं इतिहास रचला, २३ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 22, 2022 10:50 AM IST

India Women vs England Women 2nd odi: भारतीय महिला क्रिकेट संघाने २३ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. १९९९ नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर धुळ चारली आहे.

India Women vs England Women
India Women vs England Women

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. बुधवारी रात्री कॅंटबरी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ८८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ विकेट्सने पराभव केला होता.

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाने २३ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. १९९९ नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर धुळ चारली आहे.

हरमनप्रीतची कर्णधारपदाला साजेशी खेळी

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने १११ चेंडूत नाबाद १४३ धावांची शतकी खेळी केली. यादरम्यान तिने ४ षटकार आणि १८ चौकार मारले. या खेळीमुळे हरमनप्रीत कौरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हरमनच्या कारकिर्दीतील हे पाचवे वनडे शतक होते. या शतकाच्या जोरावरच भारताने निर्धारित ५० षटकात ३३३ धावांचा डोंगर उभारला होता.

हरमनशिवाय भारताकडून हरलीन देओल (५८) आणि स्मृती मानधना (४०) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

रेणुकाने इंग्लंडचे कंबरडे मोडले

३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकातच सलामीवीर टॅमी (६) धावबाद झाली आणि त्यानंतर रेणुकाने पुढच्याच षटकात दोन इंग्लिश फलंदाजांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंडने ४७ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. येथून एलिस (३९), डॅनी वॅट (६५) आणि अॅमी जोन्स (३९) यांनी काही काळ झुंज दिली मात्र ती अपुरी ठरली. संपूर्ण इंग्लिश संघ ४४.२ षटकांत २४५ धावांत गारद झाला. रेणुकाने ५७ धावांत ४ बळी घेतले.

गेल्यावर्षी भारताचा २-१ ने पराभव झाला होता

वास्तविक, भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला आहे. गेल्या वेळी भारताला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यासह मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या