भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने चीनचा १-० असा पराभव करून इतिहास रचला.
सामन्यातील पहिले ३ क्वार्टर गोलशून्य राहिल्यानंतर अखेर टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत १-० अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली.
भारताच्या जुगराजने सामन्यातील एकमेव गोल केला. भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच चीनने आक्रमक खेळ दाखवत भारतीय बचावफळीला पिछाडीवर टाकले. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र दोन्ही वेळा चीनच्या गोलरक्षकाने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
पण सामन्यातील एकमेव गोल ५१ व्या मिनिटाला झाला. यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग याने जुगराजला अप्रतिम पास दिला आणि त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलून शानदार गोल केला.
या विजयासह भारताने सुवर्णपदक तर चीनने रौप्यपदक पटकावले आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा ५-२ असा पराभव केला होता.
शेवटच्या क्षणांमध्ये चीनच्या खेळाडूंनी चेंडूवर बराच वेळ ताबा ठेवला, पण भारताचा बचावही उत्कृष्ट होता. याआधी, भारत आणि चीन स्पर्धेच्या गट टप्प्यात आमनेसामने आले होते, जिथे टीम इंडियाने ३-० असा सहज विजय नोंदवला होता.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०११ मध्ये सुरू झाली. त्यावेळी भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआउटमध्ये ४-२ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०१६ मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
यानंतर २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. तर २०२३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा ४-३ असा पराभव करून चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकली होती.