मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘पेट्रोल नाही, तरीही स्मृती मानधनाला बघायला आलोय’, जबरा फॅनचे पोस्टर व्हायरल

‘पेट्रोल नाही, तरीही स्मृती मानधनाला बघायला आलोय’, जबरा फॅनचे पोस्टर व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 03:34 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका जिंकली आहे. सामन्यादरम्यान एका मुलाचे पोस्टर चांगलेच व्हायरल झाले आहे. हा मुलगा स्मृती मांधनाचा कट्टर चाहता आहे.

viral poster
viral poster

भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. तसेच, मालिकाही जिंकली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान स्मृती मंधानाचा एक जबरा फॅन मैदानात दिसला. ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. स्मृतीच्या या कट्टर चाहत्याने पोस्टरवर जे काही लिहिले होते, ते पाहून असे नक्कीच म्हणता येईल की भारतीय महिला क्रिकेटपटूंचेही क्रिकेट जगतात खूपच चाहते आहेत. 

सामन्यादरम्यान या चाहत्याच्या पोस्टरने चांगलेच लक्ष वेधून घेतले. या पोस्टरमधून स्मृतीचा हा जबरा फॅन सांगत होता, की 'त्याला स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला'. "पेट्रोल नाही, तरीही स्मृती मानधना तुला पाहायला आलो", असे या पोस्टरवर लिहिले होते. या जबरा फॅनचे पोस्टर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटात- 

दरम्यान,  श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला असून आहे. विजेचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. यानंतर लोकांनी सरकारविरोधात निदर्शनेही केली. या सर्व प्रकारामुळे देशाचे अध्यक्ष गोटाबाया राजपाक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला आहे.

भारत मालिकेत २-० ने आघाडीवर-

भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना ३४ धावांनी जिंकला होता. तर आता तिसरा आणि शेवटचा सामना २७ जून रोजी याच स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखले होते. त्यानंतर भारताने १९.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. टीम इंडियाच्या विजयात स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली दोघींनी शानदार फलंदाजी केली. मंधानाने ३४ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ३९ तर हरमनप्रीतने नाबाद ३१ धावा केल्या. हरमनप्रीतने ३२ चेंडूत दोन चौकार मारले. हरमनप्रीतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

तर श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नने हिने ५० चेंडूत ४५ आणि कर्णधार चमारी अटापट्टूने ४३ धावा केल्या. यो दोघींशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

WhatsApp channel