मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dinesh Karthik: वर्ल्डकपनंतर टी-20 मध्ये भारताचा नवा संघ दिसणार, कार्तिक-अश्विनसाठी दारं बंद?

Dinesh Karthik: वर्ल्डकपनंतर टी-20 मध्ये भारताचा नवा संघ दिसणार, कार्तिक-अश्विनसाठी दारं बंद?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 01, 2022 11:34 AM IST

Dinesh Karthik & R Ashwin-Team India For New Zealand Tour: न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI ने संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी रोहित-विराट-राहुलसह अश्विन आणि दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, २०१९ च्या वनडे वर्ल्डकपनंतर दिनेश कार्तिक वनडे फॉरमॅटमध्ये दिसला नाही. आता या टी-२० वर्ल्डकपनंतर कार्तिकच्या टी-२० क्रिकेटलाही ब्रेक लागणार, अशी चर्चा क्रिकेट चाहते करत आहेत. या वर्ल्डकपनंतर टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा नवा संघ दिसू शकतो.

Dinesh Karthik & R Ashwin
Dinesh Karthik & R Ashwin

विश्वचषकानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठीचा संघ बीसीसीआयने सोमवारी (३१ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांनाही या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, कार्तिक आणि अश्विन यांच्यासाठी सध्या सुरु असलेला टी-२० वर्ल्डकप हा टी-२० फॉरमॅटमधील शेवटची स्पर्धा ठरु शकते. या वर्ल्डकपनंतर कार्तिक आणि अश्विन पुन्हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळताना दिसणार नाहीत, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु आहे.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने टी-२० साठी नव्या संघबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. या टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये भारताचा एक युवा संघ आपल्याला दिसू शकतो.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी विश्रांतीची मागणी केली होती आणि केएल राहुलला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. राहुल भारताकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळू शकतो. पण नव्या बदलाची सुरुवात दुर्लक्षित करता येणार नाही. कार्तिकने २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापर्यंत २७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. तसेच या संघात अश्विनचाही समावेश नाही. अश्विनला रोहित शर्माच्या आग्रहामुळे या वर्ल्डकपमध्ये संधी देण्यात आली. अश्विन ४ वर्षांनंतर या वर्ल्डकपमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळत आहे.

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांनी सांगितले की, "वर्ल्ड कप काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे आम्हाला कोणाला विश्रांती द्यायची आणि कोणाला नाही हे ठरवायचे आहे. कार्तिक चांगली कामगिरी करत आहे आणि तो आमच्यासाठी उपलब्ध आहे. पण यावेळी आम्ही विश्वचषकानंतर वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावण्याचा विचार केला आहे.”

दरम्यान, २०१९ च्या वनडे वर्ल्डकपनंतर दिनेश कार्तिक वनडे फॉरमॅटमध्ये दिसला नाही. आता या टी-२० वर्ल्डकपनंतर कार्तिकच्या टी-२० क्रिकेटलाही ब्रेक लागणार, अशी चर्चा क्रिकेट चाहते करत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या