मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रोमहर्षक सामन्यात आयर्लंडचा ४ धावांनी पराभव, भारताने मालिका जिंकली

रोमहर्षक सामन्यात आयर्लंडचा ४ धावांनी पराभव, भारताने मालिका जिंकली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 29, 2022 12:58 AM IST

शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. आपला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा उमरान मलिक गोलंदाजीसाठी होता. मात्र, आयर्लंडच्या फलंदाजांना शेवटच्या षटकात १३ धावाच करता आल्या.

umran malik
umran malik

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने अवघ्या ४ धावांनी जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडसमोर निर्धारित २० षटकात २२७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आयर्लंडला ५ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावाच करता आल्या. या रोमहर्षक विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. 

शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. आपला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा उमरान मलिक गोलंदाजीसाठी होता. मात्र, आयर्लंडच्या फलंदाजांना शेवटच्या षटकात १३ धावाच करता आल्या. 

तत्पूर्वी, भारताने आयर्लंडसमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दीपक हुडाचे शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ७ बाद २२७ धावा केल्या होत्या. हुड्डाने १०४ तर संजूने ७७ धावा ठोकल्या.

आयर्लंडचा डाव- 

दरम्यान, २२८ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सलामी दिली. आयरिश सलामीवीरांनी अवघ्या ५.४ षटकांतच ७२ धावा ठोकल्या होत्या. मात्र, त्यानंतर पॉल स्टर्लिंग बाद झाला. त्याला रवि बिष्णोईने क्लीन बोल्ड केले. स्टर्लिंगने १८ चेंडूत ४० धावा कुटल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले. 

दुसरा सलामीवीर अण्डी बालबर्नीने अर्धशतक ठोकले. त्याने ३७ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या साह्याने ६० धावा ठोकल्या. बालबर्नी मोठा फटका मारण्याच्या नादात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

त्यानंतर हॅरी टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. हे दोघे फलंदाजी करताना आयर्लंड सहज सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र, अनुभवी भुवनेश्वर कुमारने ही जोडी फोडली. त्याने टेक्टरला झेलबाद केले. टेक्टरने ३९ धावा केल्या. टेक्टरनंतर आलेल्या मार्क अडायरनेही झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने १२ चेंडूत २३ धावा केल्या. तर डॉकरेलने १६ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. मात्र, आयरिश फलंदाज १३ धावाच करु शकले.

भारताचा डाव-

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताचा सलामीवीर इशान किशन अवघ्या ३ धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र, भारतीय फलंदाजांनी आयरिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने दमदार शतकी खेळी साकारली. त्याने ५७ चेंडूत १०४ धावा ठोकल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिले शतक ठरले आहे. 

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दीपक हुड्डा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. हुड्डाशिवाय सलामीवीर संजू सॅमसननेही आज शानदार फटकेबाजी केली. त्याने ४२ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी १७६ धावांची भागीदारी रचली. भारताकडून टी-२० मध्ये ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

या दोघांशिवाय टीम इंडियाचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. भारताचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांचा समावेश आहे. आयर्लंडकडून मार्क अडायरने ३ बळी घेतले. तर जोशुआ लिटल आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

WhatsApp channel