कर्णधार म्हणून हार्दिकचा पहिलाच सामना, 'अशी' असू शकते भारताची प्लेईंग इलेव्हन
अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा क्रिकेट संघ रविवारी दोन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सामना करेल. अनुभवी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये फलंदाज सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचे स्थान पक्के मानले जात आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरु होईल.
ट्रेंडिंग न्यूज
भारताने आयर्लंडविरुद्ध यापूर्वी तीन टी-२० सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. उभय संघांमधला शेवटचा सामना २०१८ मध्ये झाला होता, जेव्हा भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मालिका २-० ने जिंकली होती. या टी-२० मालिकेसाठी हार्दिकची टीम इंडियाचा नववा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वांच्या नजरा संजू सॅमसन आणि सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड यांच्यावर असतील. अनेक संधी मिळूनही सॅमसनला टी-20 मध्ये स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. अशा परिस्थितीत ही संधी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
त्याचबरोबर ऋतुराजला संधी मिळाल्यास त्याच्यावरही चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला चार सामन्यांत केवळ एकच अर्धशतक करता आले. सोबतच, राहुल त्रिपाठीलाही संधी दिली जाऊ शकते.
याशिवाय मनगटाच्या दुखापतीतून सावरलेला सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याला हीच लय कायम ठेवावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिनेश कार्तिक उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिले अर्धशतकही झळकावले होते. तो फिनीशरचा रोल निभावेल.
फिरकीपटूंमध्ये चहलसोबत लेगस्पिनर रवी बिश्नोईची जोडी दिसू शकते. युवा बिश्नोईने टी-20 सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत त्यांच्या कामगिरीवर निवड समितीची नजर असेल. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी केली होती. यासोबतच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीही करु शकतो. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन अक्षर आणि बिश्नोई यांच्यापैकी कोणाला संधी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
तर अनुभवी भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
संभाव्य टीम इंडिया-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड/राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि हर्षल पटेल.