रांचीमध्ये सध्या FIH महिला ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (१८ जानेवारी) भारताचा जर्मनीकडून ४-३ असा पराभव झाला आहे. यानंतर भारतीय महिला हॉकी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट मिळणे कठीण झाले आहे.
तत्पूर्वी, भारत आणि जर्मनी यांच्यातील हा उपांत्य फेरीचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. यात भारताचा पराभव झाला.
दरम्यान, भारतीय महिला संघाला यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट मिळवण्यासाठी आणखी एक संधी आहे. भारताला जपानविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.
भारत आणि जपान यांच्यातील सामना शुक्रवारी (१९ जानेवारी) सायंकाळी होणार आहे. FIH महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानला अमेरिकेकडून १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत आता भारत आणि जपानमध्ये तिसऱ्या स्थानासाठी सामना रंगणार आहे.
वास्तविक, FIH महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील टॉप-तीन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. अशा स्थितीत अमेरिका आणि जर्मनीने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारत आणि जपान यांच्यातील सामना जो संघ जिंकेल तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाईल.
भारत आणि जर्मनी यांच्यातील सेमीफायनल सामना रांचीच्या बिरसा मुंडा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. यानंतर जर्मनीने पेनल्टी शूटआउटमध्ये भारताचा पराभव केला आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. आता अंतिम फेरीत जर्मनीचा सामना दुसरा उपांत्य फेरी जिंकणाऱ्या अमेरिकन संघाशी होईल.
भारतीय संघाने या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. अमेरिकेसारख्या कमकुवत संघाकडूनही भारताने मात खाल्ली आहे. मात्र, यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत इटलीचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण आता उपांत्य फेरीत पुन्हा भारताचा पराभव झाला.
संबंधित बातम्या