मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला धुतलं, चाहत्यांना युवराजची आठवण

IND vs ENG: जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला धुतलं, चाहत्यांना युवराजची आठवण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 04:45 PM IST

भारताने पहिल्या दिवशी रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर ७ बाद ३३८ धावा केल्या होत्या. काल रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी २२२ धावांची विक्रमी भागिदारी रचली होती.

bumrah
bumrah (instagram, jaspreet bumrah)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एजबॅस्टनच्या मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे. काल ८३ धावांवर नाबाद असलेल्या रविंद्र जडेजाने आज आपल्या कारकिर्दितले तिसरे शतक झळकावले. जडेजा १०४ धावांवर बाद झाला. त्याने १९४ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार खेचले. त्याला जेम्स अँडरसनने क्लीन बोल्ड केले.

दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी शेवटच्या विकेटसाठी आक्रमक भागीदारी रचली. दोघांनी स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा चोपल्या. ८४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने बुमराह आणि सिराजला घाबरवण्यासाठी बाऊन्सर टाकले. मात्र, ब्रॉडचा हा प्रयत्न कर्णधार बुमराहने हाणून पाडला. बुमराहने या षटकात ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर एका वाईड चेंडूवर ५ धावा मिळाल्या. त्याची ही फटकेबाजी पाहून चाहत्यांना युवराज सिंगची आठवण झाली. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते.

कर्णधार जसप्रीत बुमराह १६ चेंडूत ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. भारताडून मोहम्मद सिराज हा बाद होणारा शेवटचा फलंंदाज ठरला. तो २ धावांवर बाद झाला.

रविंद्र जडेजा बाद झाला तेव्हा भारताच्या ३७५ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सिराज आणि बुमराह यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला ४०० चा टप्पा गाठून दिला. सिराज आणि बुमराह यांनी शेवटच्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या.

तर इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले.

पंत-जडेजाने भारताचा डाव सावरला-

या निर्णायक कसोटी सामन्यात रिषभ पंतने संकटमोचकाची भूमिका बजावली. पहिल्या दिवशी रिषभ क्रिजवर आला तेव्हा टीम इंडियाने ६४ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली दुसऱ्या एंडकडून खेळत होता, पण कोहलीही ११ धावा करून लवकरच बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरही फार काही करू शकला नाही आणि १५ धावा करून तंबूत परतला. ९८ धावांवर भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या अडचणीच्या काळात पंत आणि जडेजा यांनी संघाचा डाव सावरला.

दोघांनी विक्रमी २२२ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान पंतने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. हे त्याचे इंग्लंडविरुद्धचे तिसरे आणि भारताबाहेरचे चौथे शतक आहे. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ३२० धावा होती. पंतने या सामन्यात १३१.५३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघ पहिल्या दिवशी ७३ षटकांत ३३८ धावा करू शकला.

WhatsApp channel