मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: एजबॅस्टनचा बदला पूर्ण, भारताने T-20 मालिका जिंकली

IND vs ENG: एजबॅस्टनचा बदला पूर्ण, भारताने T-20 मालिका जिंकली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 09, 2022 10:28 PM IST

भारताने इंग्लंडविरुद्धची (England vs India) टी-२० मालिका जिंकली आहे.

team india
team india

टीम इंडियाने दुसरा टी-२० सामना ४९ धावांनी जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला १७ षटकात १२१ धावाच करता आल्या. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. मात्र, मालिकेतील एक सामना अद्याप शिल्लक आहे. तो उद्या खेळवण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, एजबॅस्टन येथे इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ४६ धावा केल्या. त्याने या खेळीत ५ चौकार खेचले.

दरम्यान, १७१ धावांचा पाठलाग करताना इग्लंडच्या फलंदाजांनी खूपच निराशाजनक कामगिरी केली. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आजही इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने पहिल्याच  चेंडूवर जेसन रॉयला बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार आणि सलामीवरी जोस बटलर हा देखील  भुवीच्या पुढच्या षटकात स्वस्तात तंबूत परतला.  बटलरने ४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरुच शकला नाही. इंग्लंडच्या ठराविक अंतराने विकेट्स पडतच राहिल्या. त्यांच्याकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५  धावा केल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. तर बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या.

भारताचा डाव- 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली दमदार झाली. रोहित शर्माने नवा जोडीदार रिषभ पंतसोबत २९ चेंडूत ४९ धावांची सलामी दिली. ही भागीदारी रिचर्ड ग्लेसनने मोडली. त्याने कर्णधार रोहितला यष्टिरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद केले. रोहित २० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावा काढून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली आजही अपयशी ठरला. तीन चेंडूत एक धाव करुन तो बाद झाला. विराटलाही ग्लेसननेच बाद केले.  तसेच, ग्लेसनने पुढच्याच चेंडूवर ऋषभ पंतलाही बाद केले. पंत १५ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा काढून बाद झाला. लागोपाठ दोन चेंडूत दोन गडी बाद झाल्याने भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ६१ अशी झाली.

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांना केवळ २८ धावांची भागीदारी करता आली. ११ व्या षटकात ख्रिस जॉर्डनने सलग दोन चेंडूंवर सूर्यकुमार आणि हार्दिकला बाद केले. त्यानंतर आलेला दिनेश कार्तिकही लवकर बाद झाला. कार्तिकने १२ धावा केल्या. मात्र, रविंद्र जडेजाने एक बाजूने वेगाने धावा केल्या. जडेजाने  २९ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ४६ धावा केल्या. 

तर इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ४ तर आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने ३ गडी बाद केले.

WhatsApp channel