मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड, भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?

IND vs ENG: इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड, भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 04, 2022 11:16 PM IST

इंग्लंडला विजयासाठी आणखी ११९ धावांची आवश्यकता आहे. तसेच, त्यांच्याकडे अजून ७ विकेट्स शिल्लक आहेत. तर सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.

team england
team england

एजबॅस्टन कसोटीत भारताच्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ३ बाद २५९ धावा केल्या आहेत. त्यांचे जो रुट आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी चौथ्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी रचली आहे. रुट ७६ तर बेअरस्टॉ ७२ धावा करुन चौथ्या दिवसअखेर नाबाद परतले आहेत.

इंग्लंडला विजयासाठी आणखी ११९ धावांची आवश्यकता आहे. तसेच, त्यांच्याकडे अजून ७ विकेट्स शिल्लक आहेत. तर सामन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 

दरम्यान, ३७८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी वन-डे स्टाईलमध्ये फलंदाजी केली. इंग्लंडने अवघ्या २१ षटकात १०७ धावांची सलामी दिली. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने ही धोकादायक ठरणारी सलामी जोडली फोडली. त्याने जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. बुमराहचा चेंडू बाहेरच्या दिशेने स्विंग होईल, असे समजून क्रॉलीने चेंडू सोडून दिला. मात्र, चेंडू इनस्विंग होऊन थेट स्टम्पवर आदळला. क्रॉली बाद झाल्यानंतर आलेल्या ओली पोपला बुमराहने शुन्यावर तंबूत पाठवले. ओली पोप रिषभ पंतच्या हाती झेल देवून बाद झाला. 

इंग्लंडचे दोन फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यामुळे इंग्लंडचा संघ दबावात आला, आणि याच दबावात त्यांनी मोठी चुक केली. त्यांचा आक्रमक फलंदाजी करणारा अॅलेक्स लीझ हा एका चुकीच्या कॉलवर धावबाद झाला. यानंतर १०७ वर बिनबाद असणारा इंग्लंडचा संघ आता ३ बाद १०९ असा अडचणीत सापडला होता. त्यानंर मात्र, अनुभवी जो रुट आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी अतिशय काळजीपूर्वक फलंदाजी केली. दिवसअखेर दोघेही नाबाद परतले. रुट ११२ चेंडूत ७६ धावांवर खेळत आहे, त्याने या खेळीत आतापर्यंत ९ चौकार ठोकले आहेत.   तर बेअरस्टॉ ८७ चेंडूत धावा ७२ धावा करुन नाबाद परतला आहे. बेअरस्टॉने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि एक षटकार ठोकला आहे.

तत्पूर्वी,  भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात २८४ धावांत गुंडाळले होते. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. अशा प्रकारे त्याला ३७७ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने ६६ आणि ऋषभ पंतने ५७ धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ४ बळी घेतले.

भारत मालिकेत २-१ ने आघाडीवर-

भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारताने हा सामना गमावला तर भारताचे १५ वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाचे स्वप्न भंंगणार आहे. यापूर्वी २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकली होती. भारताला हा सामना एक तर जिंकावा लागेल किंवा अनिर्णित राखावा लागणार आहे.

WhatsApp channel